ST कर्मचा-यांचा संपाचा दुसरा दिवस : संपावरील तोडग्यासाठी प्रशासन-एसटी युनियन पदाधिका-यांमध्ये होणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 08:48 AM2017-10-18T08:48:36+5:302017-10-18T08:48:41+5:30
एसटी कर्मचा-यांचा संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या एसटी कर्मचा-यांच्या संपाला 24 तासांहून अधिक काळ झाला आहे.
मुंबई - एसटी कर्मचा-यांचा संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या एसटी कर्मचा-यांच्या संपाला 24 तासांहून अधिक काळ झाला आहे. ऐन दिवाळीत पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्य जनतेला मनस्ताप होत आहे. दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी 10 वाजता बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान, प्रशासन-एसटी युनियन पदाधिका-यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीत संपावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.
एसटी कर्मचारी संपावर ठाम
दरम्यान, संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं अल्टिमेटम दिला आहे. आज कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसंच निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल अशी तंबीही देण्यात आली आहे. तरीही एसटी कर्मचारी मागण्यांसाठी आपल्या संपावर ठाम आहेत.
आज कामावर रुजू व्हा
बुधवारी कामावर रुजू व्हा, अन्यथा बडतर्फ करू, असे आदेश एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिले आहेत.
६० लाख प्रवाशांचे हाल!
दिवाळीला गावी जाणा-या सुमारे ६० लाखांहून अधिक प्रवाशांचे एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे मंगळवारी अतोनात हाल झाले. विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना खासगी वाहनांनी गावी पोहोचताना, अव्वाच्या सव्वा भाडे देण्याबरोबरच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेकांना दुर्गम भागात जाण्यासाठी पायपीट करावी लागली. त्यातच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलन चिघळले आहे. कामावर परतण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहनही धुडकावत कर्मचारी संपावरठाम आहेत.
संपामुळे १८ हजार बस रस्त्यावर उतरल्याच नाहीत. महामंडळाने केवळ ४ हजार खासगी बस भाड्याने घेतल्याने पर्यायी व्यवस्थाही तोकडी ठरली. तब्बल १८ महिने कामगारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोणतीही हालचाल न केल्याने, कर्मचाºयांनी रावते यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. कामगारांच्या असंतोषाला ‘काँग्रेस’ कारणीभूत असल्याचे सांगत, रावते यांनी आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. खासगी वाहन चालकांनी प्रवाशांची लूट केली. इंटक, कामगार संघटना, मोटर कामगार फेडरेशन, कनिष्ठ कर्मचारी आणि कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सुमारे एक लाख कर्मचारी संपात सहभागी झाले आहे.
एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत चर्चेतून तोडगा काढू. कर्मचा-यांनी कामावर परत यावे. बेस्ट कर्मचारी संपात गरज पडल्यास मी स्वत: हस्तक्षेप करेन. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एसटी ५० वर्षे तोट्यात आहे. त्यामुळे पुढची २५ वर्षे सातवा वेतन आयोग देणे अशक्य आहे. मात्र काही माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. सातव्या वेतन आयोगाची मागणी अयोग्य आहे. वेतनवाढीसाठी मी तयार आहे. संघटनांनी चर्चेसाठी यावे, मी वेतनवाढ देतो. - दिवाकर रावते, परिवहन मंत्री-एसटीचे अध्यक्ष
एसटी कर्मचा-यांना ८ ते ९ हजारावर काम करावे लागते़ १९९५ पर्यंत राज्य सरकारी कर्मचारी आणि एसटी कामगारांचे वेतन समान होते. किमान १८ हजार रुपये वेतन द्यावे. दीड वर्षांपासून आम्ही मागण्यांचा पाठपुरावा करीत आहोत़ वेळोवेळी संपाची नोटीस दिली. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले. - हनुमंत ताटे, सरचिटणीस, एस. टी. कामगार संघटना
परिवहन खाते शिवसेनेकडे असल्याने भाजपाने जाणीवपूर्वक आंदोलनाबाबत उदासीन भूमिका तर घेतली नाही ना, अशी शंका विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे.
22कोटींचा एका दिवसात फटका
संपामुळे मंगळवारी एसटीचे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. गेल्या दिवाळीत महामंडळाला सुमारे ८०-९० कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
खासगी वाहन मालकांकडून लूट
मार्ग आकारलेले दर (रुपये)
पुणे-जालना ३५००
पनवेल-पुणे ५००
नाशिक-अहमदनगर ८००
मुंबई-पुणे १२००