मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारने ऐतिहासिक पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विलिनीकरणाबाबत हायकोर्टानं नेमलेल्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन गुरुवारपासून कामावर हजर राहावं असं आवाहन केले आहे. त्यानंतर आंदोलनाचं नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर जात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकारसोबत आज आमची बैठक झाली. परंतु कर्मचाऱ्यांसोबत रात्रभर चर्चा करू. आजचा मुक्काम आझाद मैदानात करू उद्या संपावर निर्णय घेऊ. सरकारने दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तर ऐकून घेतला. आझाद मैदानात कर्मचाऱ्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करू असं आम्ही पत्रकार परिषदेत सांगितले. कुठल्याही कर्मचाऱ्यांनी वेगळं मत मांडू नये. जो निर्णय घ्यायचा आहे तो विचार करून घ्यायचा आहे. सकाळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली.
सरकारच्या निर्णयावर कामगारांची नाराजी
आम्हाला पगारवाढ नाही तर विलिनीकरण हवंय. पगाराची खात्री नाही म्हणून विलिनीकरण करावं हीच मागणी आमची ठाम आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. पगारवाढीला आमची मान्यता नाही. ४२ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी सरकार कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे. पगारवाढीच्या बातम्या आल्यानंतरही कर्मचाऱ्यांची नाराजी पसरली असल्याचं चित्र आझाद मैदानात पाहायला मिळालं.
ST कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ
संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात ही वाढ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ४१ टक्क्यांनी ही वाढ दिली आहे. एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ आहे. १ ते १० वर्ष सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ हजारांची वाढ झाली आहे. १० ते २० वर्षाच्या सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ४ हजार पगारवाढ करण्यात आली आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
कशी असेल पगारवाढ?
नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ५ हजारांची वाढ. इतर भत्त्यासह एकूण वेतनात ७२०० रुपये वाढ
१ ते १० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात ४ हजारांची वाढ, इतर भत्त्यासह ५७६० रुपये वाढ
१० ते २० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात २५०० वाढ, इतर भत्त्यासह ३६०० रुपये वाढ
२० ते ३० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात २५०० वाढ, इतर भत्त्यासह ३६०० रुपये वाढ