मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक मुंबईतील निवसास्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी आरोप-प्रत्यारोपही झाले. या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यातच आता सिल्व्हर ओक घटनेपूर्वी आंदोलकांनी शरद पवार यांच्या घराची रेकी केल्याची बाब समोर आली आहे. सीसीटीव्हीतून याचा खुलासा झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सर्व आरोपींचे मोबाईल जप्त केले असून त्याचा आता तपास केला जात आहे. शरद पवारांच्या घराजवळ केलेले आंदोलन हा सर्व मोठा कट होता. त्यामुळे या परिसराची आधी रेकी केली होती. या परिसरातील आणि आझाद मैदानातील काही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. गुन्हे नोंद करण्यात आलेल्या १०९ लोकांपैकी काही लोकांची हालचाल ही शरद पवारांच्या निवासस्थानाच्या परिसरात आधीच दिसून आली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
काही लोकांची संशयास्पद हालचाल दिसून आली
या परिसरातील गाड्यांमध्ये काही लोकांची संशयास्पद हालचाल दिसून आली आहे. पोलीस याचा तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, शरद पवारांच्या घरावर हल्ला होणार याची माहिती माध्यमांना मिळाली परंतु पोलीस दलाला कळली नाही. त्यामुळे हे गृहखात्याचे अपयश आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर, शरद पवारांना भेटलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो. पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलीस सुरक्षेत कुठे त्रुटी राहिल्या त्याचा तपास सुरू आहे. जे कुणी जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशी सुरू असल्याने सविस्तर बोलता येत नाही. परंतु सुरक्षेत ज्या त्रुटी राहिल्या त्या शोधून काढू, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी जो हल्ला केला त्या घटनेवर स्वत: मुख्यमंत्री लक्ष देत आहे. तसेच शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला ते तसा हल्ला भविष्यात होणार नाही याची सरकारन खबरदारी घेण्यात यावी. स्वतः शरद पवार हे प्रतिष्ठित व्यक्ती आहे ही घटना परत व्हायला नको याची काळजी घ्यायला हवी. यावर राज्य सरकार देखील पुढे लक्ष देईल, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी म्हटले आहे.