Join us

'हे चांदणं समस्त महाराष्ट्राला दिसू द्यात'; ST कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानात रात्रीच्या अंधारात फ्लॅशलाईट सुरू करुन आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 9:13 PM

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरुच असून दिवसेंदिवस प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि इतर मागण्यांना घेऊन एसटीचे कर्मचारी राज्यभर आंदोलन करत आहेत.

मुंबई-

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरुच असून दिवसेंदिवस प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि इतर मागण्यांना घेऊन एसटीचे कर्मचारी राज्यभर आंदोलन करत आहेत. मुंबईत आझाद मैदानात देखील असंख्य कर्मचारी एकवटले आहेत. आझाद मैदानात शेकडो एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असून आज कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं सरकारविरोधात आपली भावना व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाइलचे फ्लॅशलाईट सुरू ठेवत रात्रीच्या अंधारात देखील आमचा लढा सुरू असल्याचा संदेश राज्य सरकारला दिला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना भाजपानं याआधीच पाठिंबा जाहीर केला असून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत आझाद मैदानात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांसोबत आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आज सदाभाऊ खोत यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मोबाईलचे फ्लॅश लाईट सुरू करुन एकीच्या बळाचं दर्शन घडवण्याचं आवाहन सर्वांना केलं. कर्मचाऱ्यांनी आपापल्या मोबाइलचे फ्लॅशलाईट सुरू केले आणि अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. 

सर्वांनी मोबाईलचे फ्लॅशलाईट सुरू केल्यानंतरचं आझाद मैदानातील चित्र चांदणं प्रकाशात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांसारखं दिसत होतं. "आझाद मैदानातील हे चांदणं फुललं आहे. हे चांदणं समस्त महाराष्ट्राला दिसू द्यात", असं सदाभाऊ खोत कर्मचाऱ्यांना सांगत होते. तसंच राज्यात उद्या सरकारच तेरावं घालणार तसंच परवा १४ वं करुन १५ व्या दिवशी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरासमोरच आंदोलन करू असा इशारा देखील सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. 

टॅग्स :एसटी संपअनिल परबसदाभाउ खोत