एसटी कर्मचाऱ्यांना गुरुवारपर्यंत मिळणार एका महिन्याचे वेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 02:41 AM2020-10-03T02:41:44+5:302020-10-03T02:41:59+5:30
परिवहनमंत्री; महामंडळाला आर्थिक मदत करण्याची सरकारला विनंती
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन लवकरच देण्यात येणार असून, त्यापैकी एका महिन्याचे वेतन येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे आश्वासन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एसटीची चाकेही थांबली. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटीच्या तोट्यात अधिकच भर पडली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर, २० आॅगस्टपासून ५० टक्के क्षमतेने राज्यांतर्गत एसटी सुरू झाली. त्यानंतर, १७ सप्टेंबरपासून १०० टक्के क्षमतेने एसटी वाहतूक सुरू झाली. अत्यावश्यक सेवेअंतर्गत एसटी कर्मचारी सेवेत रुजू झाले. एसटी महामंडळातील कर्मचाºयांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला अदा केले जाते. मात्र, जुलै महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.
परिवहनमंत्र्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाºयांच्या वेतनासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत महामंडळाची आर्थिक स्थिती विषद करताना, पुढील सहा महिन्यांसाठी एसटी कर्मचाºयांचे वेतन व इतर अनुषंगिक खर्चासाठी सरकारने महामंडळाला आर्थिक मदत करावी, अशी विनंती मी केली होती. त्यानुसार, अजित पवार यांनी तातडीने १५० कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. त्यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, त्यातून कर्मचाºयांचे किमान एक महिन्याचे थकित वेतन महामंडळाला देणे शक्य होईल.
उर्वरित वेतनही लवकरच : उर्वरित वेतनासंबंधीही अजित पवार यांच्याशी माझी सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच थकित वेतन एसटी कर्मचाºयांना देण्यात येईल, असेही परिवहनमंत्र्यांनी स्पष्ट केले.