Join us

एसटी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कामातून सूट; महामंडळाकडून निर्णय जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 8:11 AM

लोकमत इफेक्ट

मुंबई : राज्यात चार टप्प्यांत पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एसटी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून महामंडळाने कामगारांना कामाच्या वेळेत सूट आणि सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘कर्तव्यावर असल्याने एसटी कर्मचारी मतदानाला मुकणार’ असे वृत्त ‘लोकमत’ने ३ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ४ एप्रिलला महामंडळाने हा निर्णय जाहीर केला आहे. महामंडळाने घेतलेल्या निर्णयात मध्यवर्ती कार्यालये, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था आणि विभागीय कार्यालयातील प्रशासकीय कर्मचाºयांना मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व आगार कार्यशाळेत काम करणाºया कर्मचाºयांना मतदान करणे सुलभ व्हावे म्हणून मतदानादिवशी कामाच्या तासांत सूट देण्याचे आदेश महाव्यवस्थापक माधव काळे यांनी दिले आहेत.

महामंडळाच्या निर्णयाचे स्वागत करताना एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी यासंदर्भात चालक आणि वाहकांचाही विचार करण्याचे आवाहन केले आहे. आगाराच्या ठिकाणी मतदानाची व्यवस्था केल्यास चालक, वाहकांनाही मतदानाचा हक्क बजावता येईल. 

टॅग्स :बसचालकमतदानलोकसभा निवडणूक