एसटीच्या त्रुटी जीपमधून शोधणार, मार्गनिहाय होणार तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 07:07 AM2019-03-23T07:07:39+5:302019-03-23T07:08:15+5:30
एसटीच्या उत्पन्न आणि भारमानात लक्षणीय घट झाल्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी महामंडळाने त्रुटी शोधण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई - एसटीच्या उत्पन्न आणि भारमानात लक्षणीय घट झाल्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी महामंडळाने त्रुटी शोधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने विभागनिहाय एकूण १०३ जीप्सची खरेदी करत वाटप केले आहे. या जीप्सचा वापर मार्ग तपासणीसाठी होणार आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्यांमधील घट, मार्गावर चालक व वाहक यांची प्रवासी घेण्याबाबतची उदासीनता अशा विविध कारणांमुळे महामंडळाच्या उत्पन्न व प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातील मार्ग तपासणी व्यापक व प्रभावी करण्यासाठी महामंडळाने खरेदी केलेल्या जीप्सचा वापर करण्यात येणार आहे. या जीप्सचा वापर अन्य कोणत्याही विभागात होणार नाही, असेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एसटीच्या विभागीय कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांसह पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचा समावेश मार्ग तपासणी पथकांत करण्यास महामंडळाने सांगितले आहे. जेणेकरून अधिकाधिक मार्ग तपासणी पथके तयार होऊन प्रभावीपणे तपासणी कार्यक्रम राबविले जातील.
विभागातून जाणाºया व येणाºया इतर विभागांच्या बसेसची तपासणी प्रत्येक महिन्यातून किमान दोन वेळा करण्यात येणार आहे.
दर महिन्याला तपासणीचा आढावा
महामंडळाच्या नियंत्रण समितीचे उपमहाव्यवस्थापक यांनी प्रत्येक महिन्याला ३ दिवस आंतर प्रादेशिक व आंतर राज्य कार्यक्रम राबविण्याचे आदेश एसटीच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. तसेच रात्रवस्ती, लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेसची तपासणी करण्यासही सांगण्यात आले आहे. या तपासणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमानंतर एसटीच्या उत्पन्नासह भारमानात वाढ होईल, अशी अपेक्षा महामंडळाने व्यक्त केली आहे.