मुंबई, दि. 4 - यंदाच्या रक्षाबंधन सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले असून, प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकाच्या मार्गदर्शनाखाली ७ व ८ ऑगस्ट रोजी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी बस स्थानके, बस थांबे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. तसेच प्रवाशी बांधवानी सदर दिवशी एसटीरुपी बहिणीला 'सुरक्षित प्रवासासाठी केवळ एसटीतून प्रवास करीन' असे ओवाळणीस्वरूपी अभिवचन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ- बहिणीच्या भावनिक नात्याचा सण म्हणून 'रक्षाबंधन' सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे अथवा बहीण भावाकडे ओवाळण्यास जाते साहजिकच या दिवशी प्रवासी वाहतुकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून एसटीने यंदा आगार पातळीवर केंद्रीय स्तरावरून मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर प्रवासी गर्दी बघून एसटी बसेस सोडल्या जात होत्या. या वर्षीपासून मध्यवर्ती कार्यालयाकडून विशेष परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना दिल्या असून संपूर्ण महाराष्ट्रात 'रक्षाबंधन' सणाला एसटीच्या जादा वाहतुकीमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.विशेष म्हणजे एसटीला वर्षातील सर्वाधिक प्रवासी या दिवशी प्राप्त होत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त सुरक्षित प्रवासी वाहतूक करून चांगले उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाने ठेवले आहे. त्याकरीता प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवाशीमित्र, रस्त्यावरील बस थांब्यावर जादा वाहतुकिची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचा-याची नेमणूक करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व एसटी कमॆचारी रजा न घेता अहोरात्र काम करून प्रवाशांना सुरक्षित व वक्तशीर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतील.
'रक्षाबंधन'साठी एसटीची जादा वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 6:34 PM