Join us

मालवाहतुकीमुळे एसटी मालामाल; पण चालक कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:05 AM

मुंबई : एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून मालवाहतूक सुरू केली आहे. त्यातून महामंडळाला चांगले ...

मुंबई : एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून मालवाहतूक सुरू केली आहे. त्यातून महामंडळाला चांगले उत्पन्नही मिळत आहे. मात्र, वेळेत माल उतरून न घेणे, पुन्हा मालवाहतुकीसाठी ऑर्डर न मिळणे अशा अनेक कारणांमुळे तेथेच एक ते तीन दिवसांपर्यंतचा मुक्काम करावा लागत आहे. या काळातील सर्व खर्च चालकांना स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्य परिवहन महामार्ग महामंडळ (एसटी)ने प्रवासी वाहतूक थांबल्यानंतर उत्पन्नाचा दुसरा मार्ग म्हणून राज्यात मालवाहतूक सुरू केली. त्याला जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई विभागाने ३८ बसेसचे रूपांतर मालवाहतूक ट्रकमध्ये केले आहे. या सेवेतून महामंडळाला दररोज १० लाख रुपये मिळत आहे.

* दीड महिन्यात तब्बल साडेचार कोटींची कमाई

गेल्या दीड महिन्यात तब्बल साडेचार कोटीची कमाई झाली. एसटीच्या मुंबई विभागातील पाच आगारांतून मागणीप्रमाणे एकूण ३८ प्रवासी बसेसचे रूपांतर मालवाहतूक ट्रकमध्ये करण्यात आले आहे. त्याला उद्योग, व्यावसायिकांकडून मागणी आहे. यातून ४५ दिवसांत प्रत्येकी सरासरी १० लाख रुपयांचे उत्पन्न मुंबई विभागास मिळाले.

उत्पन्न - साडेचार कोटी

चालक - ३८

रूपांतरित मालवाहतूक एसटी ट्रक -३८

* परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

एसटी ट्रकवर कर्तव्यासाठी गेलेल्या चालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. २०० किमीपर्यंत एकट्यानेच चालकांना हे वाहन सुरक्षितरीत्या ईप्सित स्थळी पोहोचवायचे असते. यादरम्यान कोठे टायर पंक्चर अथवा घाटामध्ये वाहन सरकू अथवा अडचणीतून मार्ग काढताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम करावा लागताे.

* आगाऊ रक्कम मिळते; पण पगारातून कपात

मालवाहतुकीकरिता चालक म्हणून जाणाऱ्या चालकांना कर्तव्यावर असताना माल पोहोचविल्यानंतर तेथे माल उतरून घेण्यास कोण उपलब्ध झाले नाही तर दोन दोन दिवस तेथेच मुक्काम करावा लागतो. या काळात जेवण, नास्ता, चहा असा सर्व खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागतो. या खर्चासाठी दोन हजारांपर्यंत आगाऊ रक्कम मिळते ही रक्कम घेतल्यानंतर ती पगारातून कपात केली जाते. त्यामुळे एखाद्या चालकाला अशा चार ड्युट्या लागल्या तर त्याचे किमान चार हजार रुपये असेच जातात.

* चालक म्हणतात...

आम्हाला प्रवासी वाहतूक करण्याचा अनुभव आहे. मात्र, महामंडळ आम्हाला मालवाहतूक करायला सांगते. अनेकदा घाटामध्ये, अडचणीच्या रस्त्यावर साहाय्यक नसल्याने बस सरकणे, अपघात होणे, पंक्चर होणे, ॲक्सल तुटणे आदी समस्यांना एकट्याने तोंड द्यावे लागते. आम्ही दोन चालक द्या म्हणून मागणी करीत आहोत; पण महामंडळाचे अधिकारी परिपत्रकात एकच चालकाला परवानगी असे सांगत आहे.

- एक चालक

मालवाहतुकीकरिता चालकांना दिवसाला चारशे किमी अंतर पार करून परजिल्ह्यात जावे लागते. अशावेळी माल वेळेत उतरविला न गेल्याने दोन दोन दिवसांचा मुक्काम चालकाला करावा लागत आहे. या काळातील खर्च चालकाला करावा लागतो. त्यासाठी आगाऊ रक्कम देण्याची पद्धत आहे. मात्र, ते पगारातून कट केले जातात. हा अन्याय आहे.

- एक चालक

* प्रतिदिन ३०० रुपये भत्ता मिळाला पाहिजे

मालवाहतूक करणारे जे चालक आहेत त्यांना सक्तीने साहाय्यक दिला पाहिजे, कारण गाडी पंक्चर झाली किंवा ब्रेकडाऊन झाले तर चालकाला खूप त्रास होतो. काहीवेळा पंधरा- पंधरा दिवस भाडे मिळत नाही. अशावेळी चालकांना दूरच्या गावात राहावे लागते. खूप खर्च होतो. चालकांना प्रतिदिन ३०० रुपये भत्ता मिळाला पाहिजे.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस