Join us

डिझेल दरवाढीमुळे एसटी मालवाहतुकीची भाडेवाढ; एसटी महामंडळाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 2:20 AM

प्रति किमी ३८ दर आकारणार

मुंबई : वाढत्या डिझेल दरामुळे एसटी महामंडळाने मालवाहतुकीच्या प्रति किमी दरात ३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून ही नवीन दरवाढ लागू झाली आहे. मालवाहतुकीसाठी एकेरी वाहतुकीसाठी प्रति किमी ३५ वरून ३८ रुपये दर आकारण्यात येणार आहे.

वाढीव दर १९ जुलैपूर्वीच बुकिंग करणाऱ्यांना सुधारित भाडे लागू नसणार आहे. एकेरी जाणाºया मालवाहतुकीचा दर प्रति किमी ३८ रुपये करण्यात आला आहे. तसेच प्रति दिवस मालवाहतुकीसाठी ३ हजार ५०० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी प्रति दिवसासाठी ३ हजार रुपये भाडे होते, असे एसटी महामंडळाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात एसटीच्या ३२० मालवाहतुकीच्या गाड्या आहेत. यातून खते-बियाणे, धान्य, विटा, सिमेंट, आंबे, कांदे, रोपटे अशा सर्व प्रकारच्या सामानांची वाहतूक करण्यात आली आहे. तोट्यातील एसटीला मालवाहतुकीचा आधार मिळाला आहे.

डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाने मालवाहतुकीचे दर वाढविले आहेत. महामंडळाला डिझेलचा पुरवठा इंडियन आॅइल आणि भारत पेट्रोलियमकडून होतो. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्याने त्यांचे दर १५ दिवसांनी बदलले जातात. सध्या एसटीला प्रतिलीटर ६९ रुपयांनी डिझेल मिळत आहे. १ मे रोजी एसटीला प्रतिलीटर ४०.७२ रुपयांनी, १६ मे रोजी प्रतिलीटर ५६.३५ डिझेल मिळत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई