मुंबई:एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Strike) सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कर्मचारी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारकडून सुरू आहे. अनिल परब आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसह गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच आता. एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार नाही, असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात खासगीकरणाच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन राज्यभरातील बससेवा ठप्प झाली असतानाच विद्युत बस भाडेतत्त्वाने घेण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला महामंडळाने ९ नोव्हेंबरला 'वर्क ऑर्डर' दिल्याचे स्पष्ट झाले आहे. एसटी महामंडळाच्या मालकीची 'शिवाई' विद्युत बसची बांधणी रखडलेली असतानाच खासगी विद्युत बससाठी थेट 'वर्क ऑर्डर' देण्याचा प्रकार पाहता, हे खासगीकरणच असल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. खासगी शिवशाहीच्या धर्तीवर महामंडळाच्या या बस धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
महामंडळ प्रतिकिमीसाठी ५७ रुपये मोजणार
खासगी कंपनीची बस व चालक आणि महामंडळाचा वाहक या तत्त्वावर विद्युत बस महामंडळात दाखल होणार आहेत. या विद्युत बससाठी महामंडळ प्रतिकिमीसाठी ५७ रुपये मोजणार आहे. बारा वर्षांसाठी या बस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. या बसवर एसटी महामंडळाचे बोधचिन्ह असणार आहे. कंत्राटी शिवशाहीला महामंडळाकडून इंधन पुरविण्यात येत होते. मात्र, या विद्युत बससाठी चार्जिंग स्टेशन आणि देखभालीची जबाबदारी संबंधित कंपनीकडे असणार आहे. यामुळे ही विद्युत बस प्रवाशांसह महामंडळाच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरणार आहे, असा दावा करण्यात येत आहे.
कोणत्या मार्गांवर विद्युत बसेस धावणार?
शून्य गुंतवणुकीच्या माध्यमाने दादर-स्वारगेट, ठाणे - स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट या मार्गावर विद्युत बस चालविण्याचे नियोजन असल्याची माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई-पुणे हा मार्ग राज्यातील सर्वाधिक फायदेशीर मार्ग म्हणून ओळखला जातो. यामुळे एसटी संपाच्या काळात खासगी कंपनी आणि कंत्राटी शिवशाही-शिवनेरी मालकांनीही या मार्गाला पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाकडून वर्कऑर्डर मिळाली असून त्यानुसार काम सुरू केले आहे, असे हैदराबाद स्थित ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सांगण्यात आले आहे. १०० विद्युत बस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. येत्या ३ महिन्यांत पहिली आणि डिसेंबर २०२२ च्या अखेरीस सर्व बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.