मुंबई - दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) एसटीची सरसकट १०% भाडेवाढ होणार असून, ती केवळ १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षी याच काळात सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० % अशी भाडेवाढ केली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी केवळ १० % भाडेवाढ करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३०% पर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. यंदा यानुसारच दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय २०, १५ व १०% अशी भाडेवाढ न करता सर्व सेवा प्रकारासाठी केवळ २० दिवसांसाठी सरसकट १०% भाडेवाढ करण्यात आली असून सदर भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून लागू होईल.