पनवेलमधील एसटी कामगार वसाहतीची झाली दुरवस्था

By admin | Published: June 23, 2014 02:40 AM2014-06-23T02:40:40+5:302014-06-23T02:40:40+5:30

तुटलेल्या खिडक्या व दरवाजे, भिंतीवर वाढलेले गवत, ठिकठिकाणी घराच्या छताला गेलेले तडे तसेच शौचालयांच्या तुटलेल्या लाद्या अशी बिकट स्वरुपाची पडझड

ST labor disputes in colony of Panvel | पनवेलमधील एसटी कामगार वसाहतीची झाली दुरवस्था

पनवेलमधील एसटी कामगार वसाहतीची झाली दुरवस्था

Next

पनवेल : तुटलेल्या खिडक्या व दरवाजे, भिंतीवर वाढलेले गवत, ठिकठिकाणी घराच्या छताला गेलेले तडे तसेच शौचालयांच्या तुटलेल्या लाद्या अशी बिकट स्वरुपाची पडझड पनवेलमधील एसटी आगाराला लागूनच असलेल्या कामगार वसाहतीची झाली आहे. एकवेळ प्राणिमात्रही या ठिकाणी राहणे पसंत करणार नाही अशी अत्यंत दयनीय अवस्था येथील वसाहतीची झाली असून नाईलाजास्तव म्हणून कामगारांच्या कुटुंबियांना या वसाहतीत आपले दिवस काढावे लागत आहे. एसटी कामगारांसाठी उभ्या राहिलेल्या या वसाहतीच्या झालेल्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांच्या कुटुंबाचा जीव टांगणीला लागला आहे.
साधारणपणे तीस वर्षांपूर्वी एसटी महामंडळाकडून कामगारांसाठी पनवेल एसटी आगाराच्या बाजूस तळमजला अधिक तीन मजले अशी इमारत बांधण्यात आली. मात्र सदरची इमारत बांधण्यात आल्यानंतर आजतागायत एकदाही या इमारतीची डागडुजी करण्याचे काम संबंधितांकडून हाती घेतले नसल्याने सदरची इमारत कधीही पडू शकते या अवस्थेत आहे. एसटी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या या वसाहतीमध्ये सुमारे १२ खोल्या असून सर्वच खोल्यांची अवस्था बिकट बनली आहे. खोल्यांची दारे, खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच शौचालयाची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना एकप्रकारे नरकयातना सोसाव्या लागत आहेत. वसाहतीतील अनेक घरांचे स्लॅब कधीही कोसळू शकतात, अशा स्थितीत असून भिंतींना तडे जाऊन त्यावर गवतही जमा झालेले पहावयास मिळते. याबरोबरच स्लॅबवरील पाण्याच्या टाकीचा पाया खचला आहे.
एकंदरीत वसाहतीच्या झालेल्या या अवस्थेमुळे या ठिकाणी चोरीच्या घटनांचा सामना रहिवाशांना सहन करावा लागत आहे. वसाहतीच्या झालेल्या या दुरवस्थेमुळे या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांचे जीवन जर्जर झाले असून असंख्य कुटुंबे अन्यत्र ठिकाणी राहावयास गेले आहेत. मात्र परिस्थितीने गांजल्याने याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी राहावयास लागते अन्यथा मुका प्राणिमात्रही या ठिकाणी राहणे पसंत करणार नाही अशा व्यथा या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी सांगितली. कामगारांच्या वेतनामधून महामंडळाकडून एचआरए दरवेळेस कापून घेतला जातो.
मात्र त्यानंतरही आजपर्यंत या वसाहतीच्या डागडुजीकडे पाहण्यास महामंडळाकडे वेळ नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. इमारतीच्या या दुरवस्थेमुळे येत्या पावसाळ्यात या ठिकाणच्या कुटुंबांना अजून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याने यातून या ठिकाणच्या कुटुंबांची सुटका करण्यासाठी संबंधितांनी पुढील उपाययोजना कराव्यात अशी मागणी एसटी कामगार वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: ST labor disputes in colony of Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.