एसटी कामगार संघटनांची सहकारी बँकेतही जुंपली, लाभांशामध्ये कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 02:11 AM2017-08-25T02:11:47+5:302017-08-25T02:11:50+5:30
एसटी कामगारांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेतील कामकाजावरून एसटी कामगार सेना आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनेमध्ये चांगलीच जुंपली आहे.
मुंबई : एसटी कामगारांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेतील कामकाजावरून एसटी कामगार सेना आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनेमध्ये चांगलीच जुंपली आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर म्हणाले की, कामगारांना सातव्या वेतन आयोगाचे दिवास्वप्न दाखवणाºया संघटनेने सहकारी बँकेतही कामगारांचेच नुकसान केले आहे. सभासदांना १५ टक्क्यांपर्यंत मिळणाºया लाभांशामध्ये ११.५० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. कामगार सेनेने संचालक मंडळाच्या निर्णयावर हरकत घेत १५ टक्के डिव्हिडंड कायम ठेवण्याची मागणी केली. मात्र मान्यताप्राप्त संघटनेने बहुमताच्या जोरावर कपातीचा निर्णय कायम ठेवला. याउलट कर्ज स्वरूपात घेणाºया रकमेवरील व्याजदरात मात्र कोणतीही सूट किंवा कपात झालेली नाही. त्यामुळे कामगारांचा फायदा कमी करण्याचे काम संचालक मंडळ करत असल्याचा आरोप रेडकर यांनी केला.
यावर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुहास खासनीस म्हणाले की, भांडवल व नफा यांच्या प्रमाणात लाभांचे दर ठरवले जातात. त्याप्रमाणेच २०१६-१७ या वर्षातील नफा लक्षात घेऊन लाभांशाचा जो दर निश्चित केला आहे तो योग्यच आहे.
- मान्यताप्राप्त संघटनेचे वर्चस्व असलेल्या या सहकारी बँकेच्या लाभांशामध्ये कपात केल्याची घोषणा सोमवारी संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. त्यामुळे कामगारांच्या लाभांशामध्ये कपात केलेली संघटना वेतनवाढ काय मिळवून देणार, असा सवाल कामगार सेनेने उपस्थित केला आहे.