मुंबई विभागातील एसटी चांगल्या स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:08 AM2021-08-23T04:08:02+5:302021-08-23T04:08:02+5:30
मुंबई : कोरोनामुळे तब्बल दीड वर्षापासून तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाने आता कुठे कात टाकली होती. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत ...
मुंबई : कोरोनामुळे तब्बल दीड वर्षापासून तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाने आता कुठे कात टाकली होती. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे; मात्र राज्यातील काही ठिकाणी गाड्यातून पावसाचे पाणी गळत असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. मुंबईत अपवाद वगळता गळक्या बस नाहीत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या काळात एसटी बसेस सुरू नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावेत, याची चिंता एसटी प्रशासनाला लागली होती. जिल्ह्यासह राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुन्हा एसटी बसेस सुरू करण्यात आल्या. प्रमुख मार्गावर बसेस धावत असल्याने प्रवासी भाड्यातून उत्पन्न हाती येत आहे. एसटीचा कारभार पुन्हा पूर्वपदावर येत आहे. एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई विभागाकडे ३१९ बसेस आहेत. यातील एखादा अपवाद वगळता सर्व बसेस चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना विना तक्रार प्रवास करता येत आहे.
---
मुंबई विभागातील सर्व बस चांगल्या स्थितीत आहेत. ज्या बसेसचे सीट फाटले, छत गळत आहे अशा बसेसची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती झाली. कोरोना काळात वाहतूक बंद होती त्यावेळी अनेक बसेसची डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता भिजण्याची चिंता नाही.
वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ
........................
मी मुंबई ते पुणे नियमित एसटीने प्रवास करतो. परंतु, गळक्या बस किंवा खराब बस आढळत नाहीत. बसेसमधून पावसाचे पाणी बसमध्ये शिरण्याचे किंवा अंगावरील कपडे भिजण्याचा प्रश्न नाही.
सुजित पाटील, प्रवासी
..............................
खासगी वाहनात स्वच्छता असते. एसटीच्या लांब पल्ल्याच्या बसेस वगळता ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची स्वच्छता ठेवली जात नाही. खिडकी, आसन थुंकून घाण झालेले असते. एसटीने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
संदीप वाघमारे, प्रवासी