सुशांत मोरे, मुंबईएसटीच्या बहुतांश स्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने, प्रवाशांना सध्या पैसे खर्च करून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना शुद्ध व थंडगार पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जलशुद्धिकरण यंत्रणा स्थानकांत लवकरच बसविण्यात येणार असून, प्रवाशांना पाण्यासाठी प्रतिलीटर एक रुपया किंमत मोजावी लागणार आहे. एसटी महामंडळाकडून घेण्यात येणाऱ्या या अजब निर्णयामुळे एसटीत चांगलीच चर्चा रंगली आहे.एसटी महामंडळाच्या राज्यभरातील ५८६ बस स्थानकांवरील बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महामंडळातर्फे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अंडरग्राउंड टँक, ओव्हरहेड टँक इत्यादीमधून केला जातो, परंतु बहुतांश एसटी स्थानकांवर पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवासी, तसेच लोकप्रतिनिधींकडून महामंडळाकडे करण्यात येतात. एसटी महामंडळातर्फे प्रवाशांसाठी शुद्ध व थंडगार पाणी पुरविणे हे प्रस्तावितच आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. हे पाहता, बस स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर शुद्ध व थंडगार पाणी पुरवण्यासाठी जलशुध्दिकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळ केवळ शुद्ध पाणी पुरवणार आहे.ही यंत्रणा राबविण्यासाठी सुरुवातीला एसटीच्या सहा प्रदेशातील प्रत्येकी एका बस स्थानकाची निवड करण्यात आली असल्याचे महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले. यात मुंबई प्रदेशातील पेणमधील रामवाडी बस स्थानक, पुणे प्रदेशातील इंदापूर बस स्थानक, नाशिक प्रदेशातील पारोळा बस स्थानक, औरंगाबाद प्रदेशातील परभणी बस स्थानक, अमरावती प्रदेशातील अकोला बस स्थानक क्रमांक दोन आणि नागपूर प्रदेशातील चंद्रपूर बस स्थानकाचा समावेश आहे. ही यंत्रणा निविदा काढून खासगी संस्थांमार्फत लवकरच स्थानकांवर बसवण्यात येणार आहे.
एसटी प्रवाशांनो, शुद्ध पाण्यासाठी मोजा रुपया!
By admin | Published: December 28, 2015 3:46 AM