मुंबई : एसटीची सेवा ही प्रवाशांसाठी आहे. यामधून आंबे वाहतुकीसाठी विचारविनिमय करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी 'लोकमत' ला दिली आहे.
कोरोनाच्या साथीमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. लॉकडाऊन काळात आंब्याच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याने त्याच्या अडचणीत भरच पडली आहे. त्यामुळे सध्या प्रवासी वाहतूक बंद असल्याने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसचा या वाहतुकीसाठी उपयोग करावा, अशी मागणी आंबे उत्पादक संघ, जनता दल यांच्याकडून करण्यात आली आहे.
आंब्याच्या वाहतुकीला एसटीतुन व्हावी. यासंदर्भात पत्र आले नाही. एसटीची सेवा हि प्रामुख्याने प्रवाशांसाठी आहे. यातून सामग्री वाहतूक होत नाही. त्यामुळे आंब्याच्या वाहतुकीसाठी एसटीचा वापर करता येईल कि नाही. हे तपासून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली.
-----------------------
एसटीच्या मालगाडीची योजना फसली
एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एस्टीची मालवाहतूक सेवा आणि गोदामांच्या व्यवसायात महामंडळ राबविणार होते. लोकांना विविध सुविधा योग्य दरात उपलब्ध करुन देण्याचा एसटीचा प्रयत्न होता. कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक करण्यात येणार होती. मात्र जुन्याच बसचे या मालवाहू गाड्यांमध्ये रुपांतर करण्यात येणार होते, म्हणून परिवहन विभागाने ही मान्यता नाकारली होती. त्यामुळे एसटीच्या मालगाडीची योजना फसली.