Join us

एसटीच्या प्रवाशांना ‘डिजिटल आधार’वरही मिळणार सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 5:26 AM

एसटी बस प्रवासादरम्यान विविध प्रवासी सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाइलवरील आधार कार्ड स्वीकारण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

- महेश चेमटे मुंबई : एसटी बस प्रवासादरम्यान विविध प्रवासी सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाइलवरील आधार कार्ड स्वीकारण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना महामंडळाने राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डची मूळ प्रत दाखविणे आवश्यक असते. मात्र प्रवासात ते गहाळ, खराब होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेता यापुढे ‘आधार’ची ‘सॉफ्ट कॉपी’ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील कागदपत्र) सवलतीसाठी ग्राह्य धरावी अशा सूचना वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत.गणेशोत्सव काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा टक्का मोठा आहे. त्यामुळे महामंडळाच्या या निर्णयाचा फायदा त्यांना गणेशोत्सवापासूनच होईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी परिवहन विभागाने वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्राची मोबाइलवरील सॉफ्ट कॉपी स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आता आधार कार्डबाबत महत्त्वाचा आदेश देत ज्येष्ठांना दिलासा दिला आहे.