मुंबई : लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थाना आणण्यासाठी एसटी बस धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी 'लोकमत' ला माहिती दिली. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी एसटीच्या सुमारे १०० बस तयार करून ठेवल्या आहेत. त्यामुळे कोटा येथे सुमारे दीड ते दोन हजार अडकलेल्या विद्यार्थाना दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी आयआयटी, मेडिकल अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी राजस्थान मधील कोटा येथे शिकण्यासाठी जातात. मात्र लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी आयआयटी, मेडिकल अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी गेलेले विद्यार्थी लाॅकडाऊनमूळे अडकले आहे. यावर्षी कोटा येथे शिकायला गेलेल्या सुमारे दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. दुसऱ्या टप्यातील लॉकडाऊन वाढल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यात परत येण्यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या धुळे विभागातून १०० बस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती परब यांनी दिली.
--------------------------
राजस्थान येथील कोटा येथे लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज आहे. त्यासाठी सध्या ९१ बस तयार केल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे जादा बस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
--------------
अशीही एक अडचण महाराष्ट्रातून कोटा येथे जाताना गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान असे तीन राज्य लागणार आहे. या तीन ही राज्यातील राज्य परिवहन विभागाचे परमीट घ्यावे लागते. त्यानंतर १०० गाड्यांसोबत एसटीचे २०० चालक, यांत्रीकी कर्मचारी जातील. या दरम्यान तिन्ही राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याची मागणी होऊ शकते. कोटा येथून धुळे येथे आल्यावर विद्यार्थ्यांना त्याच्या विविध जिल्ह्यातील घरी पाठविण्याचे आवाहन आहे. दरम्यान, यावर योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परब यांनी दिली.
--------------
चालकांना पीपीई किट नाही; फक्त मास्क
महाराष्ट्र ते राजस्थान लांबचा पल्ला असल्याने एसटीच्या एका बसला दोन चालकाचे नियोजन केले आहे. त्यामुळे राज्यातून एसटीचे सुमारे २०० चालक कोटा येथे जाणार आहेत. मात्र या चालकांना पीपीई किट मिळणार नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात येणार आहे. आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. कोटा येथून विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन केले जाईल, असे परब यांनी सांगितले.
--------------