रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळातही अविरतपणे काम करणाऱ्या एस.टी. चालक - वाहकांनी राज्यात रक्ताचा तुटवडा पडल्यावर मागे-पुढे न पाहता ‘रक्ताचं नातं’ या लोकमत समूहाच्या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरात भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘लोकमत’ व ‘महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस’च्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर बुधवारी मुंबई सेंट्रल येथे एस.टी. आगारात पार पडले. या रक्तदान शिबिरास एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक माधव काळे, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस या संघटनेने या शिबिरात पुढाकार घेतला. तर मुंबई सेंट्रल एस. टी. आगार प्रमुख गुलाब बच्छाव यांनी या शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिली. सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत रक्तदान मोहीम सुरू होती. या वेळी ५० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
राज्य परिवहन मंडळाचे मुंबई प्रदेश उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड, वाहतूक महाव्यवस्थापक संजय सुपेकर, मुंबई विभाग नियंत्रक मोनिका वानखेडे, मुंबई सेंट्रल एस. टी. आगारप्रमुख गुलाब बच्छाव आणि महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकडे आदींनी या शिबिरास उपस्थिती लावली.
कोरोना काळात आपल्याला रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यात कोणीतरी असा लोकोपयोगी उपक्रम राबविणे गरजेचे होते. ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन मोठे सामाजिक कार्य केले आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. आमचे सहकारी या महायज्ञात सहभागी झाले. मी नागरिकांना आवाहन करीत आहे की त्यांनीही रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. ‘लोकमत’च्या या महायज्ञात मीही खारीचा वाटा उचलत आहे. माझ्याप्रमाणे अन्य लोकांनीही या यज्ञात सहभागी व्हावे आणि समाजाप्रति असलेली बांधिलकी जपावी.
- विधी पवार, एस. टी. वाहक