Join us

ST Strike: अटकेतील 89 ST कर्मचाऱ्यांची आज तुरुगांतून सुटका, पाऊले चालती घराची वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 3:38 PM

गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कामावर रुजू होत आहेत

मुंबई - राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची चाके पुन्हा सुरू झाली आहेत. मात्र, देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. विलगीकरणाच्या मुद्द्यावरुन तब्बल ५ महिने एसटी कामगारांचा हा संप सुरूच होता. मात्र, कामगारांच्या या लढ्याला शेवटच्या क्षणी गालबोट लागलं होतं. त्यामध्ये, १०९ कामगारांना अटक करण्यात आली होती. आज १८ दिवसांनंतर ८९ एसटी कामगारांची नवी मुंबईतील तळोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कामावर रुजू होत आहेत. गेल्या आठवड्यात, अल्टिमेटमच्या शेवटच्या दिवशी ५,३९८ कर्मचारी रुजू झाले. आता एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले असून,  उपस्थित कर्मचाऱ्यांचा आकडा ८२,२६० वर पोहोचला आहे. त्यामुळे एसटीची ८५ टक्के वाहतूक पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे, एसटी आता पूर्वपदावर येत आहे. त्यातच, संपातील प्रमुख कामगारांनी शरद पवार यांच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यावेळी, झालेल्या गोंधळानंतर कामगारांचे वकिल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी, ८९ कामगारांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर, आज तळोजा कारागृहातून या कामगारांची सुटका करण्यात आली.

तळोजा तुरुंगात अटक असलेल्या ८९ एसटी कामगारांना आज जामीन मिळाल्याने सोडण्यात आले. मात्र त्यांना कामावर हजर होण्यासंबधी सभ्रम कायम आहे. मागील १८ दिवसांपासून अटकेत असलेले एस.टी. कर्मचारी आज तुरुंगातून बाहेर आले. या कामगारांना भेटण्यासाठी, घरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे कुटुंबीय येथे पोहोचले होते. हे सर्वजण आता आपापल्या घरी जात आहेत. मात्र, कामावर हजर होण्या संबंधी अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे, या कामगारांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दरम्यान, राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या चालक- वाहकांना आर्थिक लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी महामंडळाचे राज्यभरातील चालक-वाहक दिवाळीपासून बेमुदत संपावर होते. प्रवाशांची गैरसोय होत असून, ती टाळण्यासाठी कामावर रूजू व्हा, असा आदेश हायकोर्टाने दिला होता. 

टॅग्स :एसटी संपमुंबईन्यायालयतुरुंगशरद पवार