ST Strike: मुंबईतून सुटले अन् साताऱ्यात फसले, सदावर्तेंना पोलिसांनी गाडीत घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:48 PM2022-04-14T12:48:56+5:302022-04-14T16:35:41+5:30
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सदावर्ते यांनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं
मुंबई - मागील ४ महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यात काही संतप्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घरावर हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी गिरगाव कोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तत्पूर्वीच सातारापोलिसांनी त्यांचा ताबा घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सदावर्ते यांनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं. तेढ निर्माण होईल, असं ते वक्तव्य असल्याने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. दीड वर्षापूर्वी केलेल्या विधानावरून सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावर कोर्टाने सदावर्तेंना अटक करण्याची नोटीसही बजावली. त्यानुसार गिरगाव कोर्टात सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा देण्यासाठी अर्ज केला होता. त्याला कोर्टाने परवानगी देत १७ एप्रिलला पर्यंत ताबा घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार, सातारा पोलीस कालच मुंबईत दाखल झाले. त्यानंतर, गुणरत्न सदावर्तेंना ताब्यात घेऊन ते आज साताऱ्याला रवाना झाले आहेत. पोलिसांसमवेत मोठा फौजफाटा दिसून आला.
दरम्यान, गिरगाव कोर्टात सुनावणी होताना सरकारी वकिलांनी सदावर्ते यांना ७ दिवसांची आणखी कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.