Join us

ST Strike: ST कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ; सरकारची घोषणा, संप मागे घेण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 6:57 PM

Anil Parab PC: कामगारांची विलिनीकरणाची मागणी कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. कमिटीचा जो काही निर्णय येईल तो मान्य करू अशी शासनाची भूमिका आहे

मुंबई – गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप(ST Strike) मागे घेण्याबाबत सरकारने एक पाऊल पुढे टाकलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या निर्णयावर तुर्तास संप मागे घ्यावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांच्यासह शिष्टमंडळाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यातील प्रमुख मागणी विलिनीकरणाची होती. यावर सरकारची भूमिका स्पष्ट होती. हा विषय उच्च न्यायालयात गेला असून त्यावर त्रिसदस्यीय कमिटी बनवली. १२ आठवड्याच्या आत या कमिटीचा रिपोर्ट येईल. विलिनीकरणाबाबत कर्मचाऱ्यांचे जे म्हणणं आहे ते कमिटीसमोर मांडावा असा कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे कामगारांची विलिनीकरणाची मागणी कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. कमिटीचा जो काही निर्णय येईल तो मान्य करू अशी शासनाची भूमिका आहे. विलिनीकरणाबाबत न्यायप्रविष्ट बाब असल्याने तिढा निर्माण झाला. संपामुळे राज्यातील ग्रामीण जनतेची, शाळेय विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे संपावर मध्य मार्ग काय काढायचा यावर सरकार प्रयत्नशील होतं असं त्यांनी सांगितले.

तसेच संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात ही वाढ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ४१ टक्क्यांनी ही वाढ दिली आहे. एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ आहे. १ ते १० वर्ष सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ हजारांची वाढ झाली आहे. १० ते २० वर्षाच्या सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ४ हजार पगारवाढ करण्यात आली आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

राज्य सरकारने एसटी महामंडळाला २७०० कोटी रुपये पगारासाठी दिले होते. कोरोना काळात काही कारणास्तव कर्मचाऱ्यांचे पगार उशीरा होत होते. त्यामुळे यापुढे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेआधी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होईल अशी हमी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. कामगारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी Intensive कर्मचाऱ्यांना देणार आहे. एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवलं तर त्या चालक-वाहक कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय ही रक्कम दिली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाबद्दल शासन सहानुभुतीनं विचार करेल असंही अनिल परब म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पूर्ण झालेल्या मागण्या

एसटी कर्मचाऱ्यांना यापुढे १० तारखेच्या आत पगार मिळणार

जे कामगार मुंबईत संपावर आहेत त्यांना परवा कामावर येण्याची सूट

निलंबित कामगारांना पुन्हा सेवेत घेणार

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ६६० कोटींचा बोझा

कशी असेल पगारवाढ?

नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ५ हजारांची वाढ. इतर भत्त्यासह एकूण वेतनात ७२०० रुपये वाढ

१० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात ४ हजारांची वाढ, इतर भत्त्यासह ५७६० रुपये वाढ

२० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात २५०० वाढ, इतर भत्त्यासह ३६०० रुपये वाढ

३० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात २५०० वाढ, इतर भत्त्यासह ३६०० रुपये वाढ

टॅग्स :एसटी संपअनिल परब