ST Strike : किरीट सोमय्या अन् गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी मोर्चातूनच घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:12 PM2021-11-10T15:12:00+5:302021-11-10T15:14:10+5:30
भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी किरीट सोमय्या आणि पडळकर यांना ताब्यात घेतलं
मुंबई - एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असले तरी एसटीतील कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे राज्यभर भाजपा नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊन सरकारला इशारा दिला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी किरीट सोमय्या आणि पडळकर यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे एसटी कर्मचारी प्रचंड संतापले असून आमदार निवास परिसरात काही काळ संतापाचं वातावरण पसरलं होतं. तर, दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात जाऊन संपातील कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, आता मागे हटणार नाही, असे म्हटले आहे.
किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर हे आमदार निवासातून बाहेर आले आणि संपकऱ्यांच्या मोर्चात सामील झाले. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे सरकार हाय हाय, एसटीचं विलनीकरण झालंच पाहिजे… अशी घोषणाबाजी कर्मचाऱ्यांनी केली. आम्ही मंत्रालयाच्या दिशेने निघालो आहोत. पण आम्हाला अटक करत आहेत. अनेकदा तुरुंगात जाऊ, पण एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ. कितीही वेळा अटक करा. आम्ही कामगारांना न्याय मिळवून देऊ, असं सोमय्यांनी यावेळी बोलताना म्हटले.
पोलिसांचा वापर करून मंत्रालयाकडे निघालेल्या #एसटी_कर्मचाऱ्यांना रोखलं जातंय. #लोकशाही मार्गाने चालू असलेल्या #आंदोलनात@advanilparab यांना उद्रेक घडवायचाय का? यांच्या #निजामशाहीमुळे कर्मचाऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची जबाबदारी #ठाकरे सरकारची राहिल.@CMOMaharashtrapic.twitter.com/5scKAHcg3B
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 10, 2021
मुख्यमंत्र्यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन
"एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे".
राजकीय पोळी भाजू नका - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय पक्षांनाही विनंती केली आहे. ते म्हणाले, "राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या."