मुंबई - राज्यातील एसटी कामगारांच्या प्रदीर्घ संपाला वेगळेच वळण लागले होते. या संपात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारला तीव्र विरोध करत एन्ट्री घेतली. त्यानंतर, आझाद मैदानात मोठे आंदोलन उभारले गेले. या आंदोलनात भाजप समर्थक नेतेही सहभागी झाले होते. तर, न्यायालयाच्या निर्णयानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराकडे मोर्चा वळवला. या मोर्चातील 119 आंदोलकांना ठाकरे सरकारने बडतर्फ केले होते. आता, एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हे सर्वच कष्टकरी कामगार आता लवकरच कामावर जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देईल. केवळ एसटी कर्मचाऱ्यांनाच नाही, तर शेतकरी आणि कष्टकरी, कामगारालही न्याय देईन. कसेल त्याची जमिन या कायद्यानुसार, शेतमजूरांनाही, पिढ्यान-पिढ्या राबणाऱ्या शेतमजुरांनाही जमिन मिळवून देण्यासाठी हे सरकार पुढाकार घेईल, असे एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. आमची ही केवळ संघटना नसून ती चळवळ आहे, त्यामुळे चळवळ कायम राहत असते. आमची ही चळवळ यापुढेही सुरूच राहिल. आम्हाला देवेंद्र फडणवीसांचं सरकार न्याय देईल, असे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या काळातील काळ्याकुट्ट सरकारमुळे माझे 100 एसटी कर्मचारी बांधव घरी बसले आहेत. परंतु, याच एसटी कामगारांनी आमदारांमध्ये विश्वास निर्माण केला आणि कोई कुछ नही रहता हे दाखवून दिलं. त्यातूनच, शरद पवाराचं सरकार चले जाव झालं. आता, ते 119 कष्टकरी बँड लावून कामावर जातील यात मला शंका नाही, असेही गुणरत्न सदावर्तेंनी विश्वासाने सांगितले.
दरम्यान, एड. गुणरत्न सदावर्ते यांनी तुरुंगवारीनंतर राजकारणात एन्ट्री घेतली. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या नव्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची घोषणा केली. तसंच एसटीच्या बँकेची निवडणूकही आपली संघटना लढवणार असल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. दरम्यान, ९५ टक्के कर्मचारी हे एस टी कष्टकरी जनसंघाचे सभासद असल्याचा दावा त्यांनी केला होता. ठाकरे सरकारविरुद्ध सदावर्तेंनी मोठं आंदोलन उभारलं. आता, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने सदावर्तेंचा आत्मविश्वास वाढला आहे.