ST Strike: 'एक गुणरत्न लाख गुणरत्न तयार झालेत, आम्हाला दाऊद इब्राहिमची भीती नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 07:44 PM2022-03-03T19:44:21+5:302022-03-03T20:05:18+5:30
माझा स्वाभीमान भारताच्या संविधानातून येतो, त्या स्वाभीमानातून मी बोलतो. मी अतिरेकी दाऊद इब्राहिमच्या विरोधात बोलतो.
मुंबई - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. त्यावेळी, विरोधकांनी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरुन सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. तसेच, विधिमंडळ सभागृहाताबाहेर सरकारचा निषेध नोंदवत दाऊद इब्राहिमच्या संबंधित लोकांना वाचविण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा घणाघाती आरोपही भाजप नेत्यांनी केला. एखादा मंत्री तुरुंगात असूनही त्याचा राजीनामा घेतलेला नाही हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. त्यानंतर, एसटी कामगारांच्या विलिगीकरण प्रस्तावासंदर्भात बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी राज्य सरकारला लक्ष्य केलं.
माझा स्वाभीमान भारताच्या संविधानातून येतो, त्या स्वाभीमानातून मी बोलतो. मी अतिरेकी दाऊद इब्राहिमच्या विरोधात बोलतो. आम्ही दाऊद इब्राहीमच्या विरोधात उतरणार आहोत, आम्ही रझा अकादमीच्या विरोधात उतरणार आहोत. पण, आम्ही घाबरणार नाहीत, आम्ही आमदार बुखारी नाहीत. कष्टकऱ्यांचे नेते दत्ता सामंत यांच्या पाठिशी एवढं पाठबळ नव्हतं. पण, आता एक गुणरत्न लाख गुणरत्न तयार झाले आहेत. त्यामुळे, दाऊद इब्राहिमला माझा खून करण्याआधी, जयश्री पाटीलचा खून करण्याआधी, सगळ्यांनी समजून घ्यायचं. जयंत सदावर्तेही सगळ्यांना पुरुन उरणारी आहे. म्हणून आम्हाला दाऊद इब्राहिमची भीती नाही, शरद पवारांची भीती नाही, असे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटले.
मुख्यमंत्री अतिरेक्यंसाठी झुलणार का?
सरकारला कष्टकऱ्यांबाबतीत संवेदना नाहीत, पण दाऊद इब्राहीमच्या माणसांसोबत तुमचं जमतंय. त्यांसाठी, तुम्ही उतावीळ झालात, असे म्हणत सदावर्ते यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव तुम्ही कष्टकऱ्यांसाठी आहात, की 1993 च्या बॉम्बस्फोटातील अतिरेक्यांसाठी झुलणार आहात. तुम्ही कष्टकरी कामगारांना विलिनीकरण देणार आहात का, यासाठी सामान्य शाखेतील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे डोळे लावून बसलेला आहे, असेही सदावर्तेंनी म्हटले.
फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या आरोपींसोबत व्यवहार केल्याचं नवाब मलिकांच्या रिमांडमध्ये स्पष्ट नमूद असतानाही त्यांचा त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, हे सरकार दाऊद शरण सरकार आहे, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. "जी शिवसेना दाऊदचं नाव आलं तरी आक्रमक होत होती आज त्याच शिवसेनेचे मुख्यमंत्री दाऊदसोबत व्यवहार केलेल्या व्यक्तीला पाठिशी घालत आहे. दाऊद सोबतच्या व्यवहारात हात असलेल्या मंत्र्याला पाठिशी घालण्यासाठी ठाकरे सरकारवर नेमका कुणाचा दबाव आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगावच लागेल. नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजपा शांत बसणार नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.