ST Strike: ... तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, CSMT स्थानकातून ST आंदोलकांनी सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 10:23 AM2022-04-09T10:23:23+5:302022-04-09T10:24:31+5:30
आझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत त्यांना बाहेर काढले असून ५ कर्मचाऱ्यांना ताब्यातही घेतले आहे.
मुंबई - एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या 5 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांनी गोंधळ घातला. याप्रकरणी, पोलिसांनी 107 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अॅड. गुणरत्न सदावर्तेंना अटकही केली आहे. तर, आझाद मैदानातील आंदोलकांना हाकलून देण्यात आले आहे. सध्या हे आंदोलन सीएसएमटी स्थानकावर ठिय्या मांडून बसले आहेत.
आझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत त्यांना बाहेर काढले असून ५ कर्मचाऱ्यांना ताब्यातही घेतले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात सरकारविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली आहे. जोपर्यंत सदावर्ते आम्हाला जायला सांगत नाहीत, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे, रेल्वे स्थानकावरील या एसटी कर्मचाऱ्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमचे काही कर्मचारी गायब
पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात आम्हाला मध्यरात्री आझाद मैदानातून हुसकावून लावलं. आम्हाला सीएसएमटी स्थानकात सोडण्यात आलं पोलिसी कारवाईदरम्यान अनेक कर्मचारी जखमी झाले. तर काही कर्मचारी गायब झाले. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र त्यांना फोनही लागत नाहीत. आमचे सहकारी कुठे गेले, त्यांना कुठे ठेवण्यात आलं आहे, असे प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले. आमचे सहकारी परत येत नाहीत, तोपर्यंत आम्ही सीएसएमटी सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्यानंतर मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी बाहेर निघण्यास नकार दिला होता. वकील गुणरत्न सदावर्ते सांगतील तोपर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र, मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत २५० कर्मचाऱ्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात बसून ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे. शेकडो कर्मचारी सीएसएमटी स्थानकात बसून सरकारविरोधात घोषणाबाजी देत आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, जवळपास १५० ते २०० कर्मचारी पवारांच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना आंदोलकांनी खळबळजनक दावा केला आहे.
सदावर्तेंना अटक
एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची भाषणं तपासली पाहिजेत, अशी मागणी केली होती. त्यांनतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील आहेत.
आंदोलनानंतर सदावर्ते यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. या घटनेवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली होती. "एकशे चोवीस महिलांचे कुंकू पुसले गेले. हल्लेखोर असते, तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे गुलामगिरीतून बाहेर येण्याचे लक्षण आहे," असंही ते म्हणाले होते.