मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिगीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचं संपातील कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. या संपामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे आणि प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे, परिवहनमंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशी प्रभावित झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याचं वर्णन न केलेलं बरं, अशा शब्दात शरद पवारांनी जनतेचे हाल व्यक्त केले आहेत. त्यातच करोनाचा ओमायक्रॉन नावाचा करोनाचा नवीन अवतार आल्यानं देशावर आणि राज्यावर संकट आलंय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राज्यातील अर्थकारणावर होतोय. त्यामुळे राज्यातील राज्य सरकारला त्याची मोठी आर्थिक किंमत द्यावी लागतीय, असेही पवार यांनी सांगितले. शरद पवारांनी संपातील कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचेही आवाहन केले आहे. त्यानंतर, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
''ST संपामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचे हाल होताहेत, हे सरकारला आत्ता समजलं? लाल परी धावत नसल्याने ग्रामीण भागातली प्रवास व्यवस्था लंगडी झालीये. त्याकडे लक्ष द्यायला शरद पवार यांना आजवर का वेळ झाला नाही? आजचा मुहूर्त होता?'' असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलंय. तसेच, ''बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मनोरंजन केलं. ST कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, असं परब सांगतात. मग आजवर कारवाई झालेल्यांचं काय? परबसाहेब, कारवाईची भीती मविआ सरकारवरील अविश्वासातून निर्माण होतेय. कारवाई नाही, पगारवाढीसाठी चर्चा करू, विलिनीकरणाचं कोर्ट सांगेल ते पाहू... मग मविआ सरकारकडे ST कर्मचाऱ्यांसाठी आहेच काय?'', असाही प्रश्न पाटील यांनी विचारला.