एसटीचा प्रवास सुरक्षित मग ट्रॅव्हल्सला पसंती का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:06 AM2021-07-29T04:06:31+5:302021-07-29T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखाचा समजला जातो. असे असले तरी प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्सला अधिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखाचा समजला जातो. असे असले तरी प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्सला अधिक पसंती दिली जात असल्याचे समोर आले आहे. केवळ पैशांची बचत आणि वेळेच्या बंधनामुळेच प्रवासी ट्रॅव्हल्सकडे धाव घेत असल्याचे दिसून येते.
मुंबई विभागात ५ आगार आहेत. जवळपास २१९ बस प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत. मागील दीड वर्षापासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. एसटी महामंडळाच्या अनेक बसची हालत खस्ता झाली आहे. याउलट खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांना वातानुकूलित सुविधा दिली जाते. त्यासोबतच मनोरंजनासाठी एलईडी टीव्ही, चार्जिंग करण्यासाठी प्लग आदी सुविधा दिल्या जात असून, महामंडळाच्या बसपेक्षा तिकीट कमी असते. त्यामुळे प्रवासी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाकडे वळत आहेत. त्यातही ट्रॅव्हल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने कुठेही जायचे असल्यास अर्धा तासात सहज बस मिळते. त्यामुळे अनेक जण ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देत आहेत.
एसटीला स्पीडलॉक, ट्रॅव्हल्स सुसाट
एसटी महामंडळाच्या बहुतांश बसचा स्पीड लॉक केला असतो. त्यामुळे चालकाला वाहनाची गती वाढविणे अशक्य असते. याउलट ट्रॅव्हल्स सुसाट वेगाने पळत असतात. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेचचा स्पीड ६५ किलोमीटर प्रतितास, लांब व मध्यम पल्ल्याच्या ७० वर आणि शिवशाही ७५ ते ८० पर्यंत स्पीड लॉक करण्यात येतो. त्या तुलनेत ट्रॅव्हल्सचा स्पीड अधिक असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सला प्राधान्य देत असतात.
आराम महत्त्वाचा की सुरक्षित प्रवास?
ट्रॅव्हल्समध्ये चित्रपट बघत किंवा गाणे ऐकत मनोरंजनात्मक प्रवास करता येते. याउलट एसटी बसमध्ये टीव्ही व नेटची व्यवस्था असतानाही ते कधीच सुरू दिसून येत नाही. त्यातच भाडे कमी असल्याने मी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देते.
-नारायण शिर्के, प्रवासी
ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असतो. त्यामुळे मी दूर जायचे असेल, तर ट्रॅव्हल्सने जातो. एसटीचा प्रवास सुरक्षित असला तरी मला ट्रॅव्हल्सने प्रवास करायला आवडते. जवळ जायचे असेल तर मी एसटीने प्रवास करतो.
-वैभव वाकचौरे, प्रवासी
एसटीतून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य
एसटीचे चालक प्रशिक्षित असतात. त्यांना सावधगिरीने वाहन चालविण्याच्या सूचना असतात, तसेच प्रवाशांसाठी महामंडळातर्फे काही योजनाही राबविण्यात येत असतात. एकदंरीत एसटीतून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे प्रवाशांची एसटीतून प्रवास करून, महामंडळाला सहकार्य करावे.
-वरिष्ठ अधिकारी एसटी महामंडळ
जानेवारी ते जून २०२१ अपघात
वाहन प्रकार/अपघात संख्या
जीप - १
ट्रॅव्हल्स/ इतर बस - २५
एसटी बस - ३
दुचाकी - ४३७
टॅक्सी - १८
कार- १७९
ट्रक/ टँकर/ टेम्पो - ७८
ट्रॅक्टर - १
इतर वाहने - ४८
अज्ञात वाहने - १२१
एकूण - ९५६