आषाढीसाठी एसटी ५ हजार जादा बस सोडणार, वाचा सविस्तर
By सचिन लुंगसे | Published: June 11, 2024 07:51 PM2024-06-11T19:51:46+5:302024-06-11T19:52:03+5:30
ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार
मुंबई : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. यंदा कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत. रस्त्यावर कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होऊ नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत.
मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रे निमित्त ४२४५ विशेष बस सोडल्या होत्या. याव्दारे १८ लाख ३० हजार ९३४ प्रवाशांची एसटीने ने-आन केली होती.
सवलती लागू
७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.
तात्पुरती स्थानके
पंढरपूर येथे होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.
स्थानकावर काय
बस स्थानकावर पिण्याचे पाणी, शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक या सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
बस स्थानकाचे नाव / जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बस
चंद्रभागा बसस्थानक / मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
भिमा यात्रा देगाव / छत्रपती संभाजी नगर, नागपूर व अमरावती प्रदेश
विठ्ठल कारखाना / नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
पांडुरंग बसस्थानक / सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग