मध्ये रेल्वेच्या ब्लॉक काळात प्रवाशांच्या मदतीला एसटी धावणार; ठाण्यासाठी जादा ५० बसेस
By सचिन लुंगसे | Published: May 30, 2024 07:40 PM2024-05-30T19:40:38+5:302024-05-30T19:41:14+5:30
सध्या मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई : ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरणासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात लोकल प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एसटी मदतीला धावली आहे. एसटी महामंडळाने ब्लॉक काळात जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीच्या निर्णयानुसार, कुर्ला नेहरुनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी ५० जादा एसटी गाड्या चालविल्या जातील. सध्या मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता यात आवश्यक्तेनुसार वाढ केली जाईल. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे आणि मुंबई आगरात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.