मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीनं शपथनामा जारी केला. त्यात एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखं वेतन देऊ असं जाहीर नाम्यात म्हटलं होतं. मग हा जाहीरनामा कुठलीही हर्बल वनस्पती घेऊन बनवला नव्हता ना? याचं उत्तर महाविकास आघाडीच्या सरकारने द्यावं अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) म्हणाले की, मविआ सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर लोकं सरकारला भस्मसात करतील. ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल त्यांना भाजपा सरकार आल्यास त्यांना पुन्हा सेवेत घेऊन त्यांना दुपटीनं आर्थिक नुकसान भरपाई देईल. सरकारचं डोकं ठिकाणावर असणं गरजेचे आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण करताना आर्थिक गणित समजत नसेल तर ते आम्ही समजवायला तयार आहोत. १२ हजार कोटींची आर्थिक तूट असल्याचं परिवहन मंत्री बोलले. पण गेल्या दीड वर्षात ६ हजार कोटींचा तोटा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झाला हे सांगायला मंत्री विसरले असा टोला मुनगंटीवारांनी अनिल परब यांना लगावला.
तसेच बेस्ट कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना पगार जास्त मग एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी का? हा भेदभाव थांबवण्याचं काम सरकारने केले पाहिजे. ३६५ दिवस केवळ महाविकास आघाडी राजकारण करत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये गोंधळ होतोय. विद्यार्थ्यांचे नुकसान केलं जातंय. राजकारण करू नका जो शब्द तुम्ही जाहिरनाम्यात दिला त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा असं आवाहन सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला केले आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाचं विलीनीकरण होऊ शकत नाही याबाबत माझा अर्धवट व्हिडीओ फिरवला जातोय. हे सरकार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शिमग्याचं राजकारण करत आहे. हा जुना व्हिडीओ अर्धवट दाखवला जातो. त्यात मी संबंधित कर्मचाऱ्याला परिवहन विभाग शिवसेनेकडे आहे. त्या विभागाने तसा प्रस्ताव पुढे आणावा. कायदेशीरही प्रक्रिया राबवली जाईल असं म्हटलं होतं. शिवसेना-भाजपा युतीच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी एसटी महामंडळाला सर्वाधिक निधी दिला होता असं सांगत व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे.