मुंबई – राज्यभरात ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. आपली लढाई मूकबधिर, आंधळ्या सरकारसोबत आहे. पोराला खायला आणू शकत नाही म्हणून एसटी कर्मचारी असलेल्या बापानं आत्महत्या केली. धुळ्यात महिला एसटी कर्मचारीनं कुटुंबासह आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसणं गरजेचे होते. हे सरकारनं बघण्याऐवजी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस देतायेत. कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली. मराठीचा मुद्दा घेऊन मताचे राजकारण करतायेत ज्या ३५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली ते मराठी नाहीत का? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
आझाद मैदानावर मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी जमले होते. या मोर्चाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, एसटी कर्मचारी बायकापोरं घेऊन मुंबईत आले आहेत. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाहीतर तोपर्यंत मुंबई सोडायची नाही. भाजपाचा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाशी संबंध नाही. कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त आंदोलन केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं कर्तव्य भाजपा म्हणून आमचं आहे. माणुसकीच्या धर्माने आम्ही तुमच्यासोबत आहोत. आज अडवाल तर उद्या काय कराल. गरिबांना पैसे द्यायला नाहीत का? तुमचा दसरा, दिवाळी गोड केली गोरगरिब एसटी कर्मचाऱ्यांचं काय? दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी सरकारला विचारला.
प्रत्येक प्रवाशावर १ रुपया कर आकारला जातो. रोज ६५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. महिन्याचे २१ कोटी होतात हे पैसे जातात कुठं? हे पैसे मातोश्रीवर जातात. कर्मचाऱ्यांना पैसे द्यायची वेळ आली तेव्हा महामंडळ तोट्यात असल्याचं सांगितले जाते. एक डिझेल टँकर डेपोकडे जातो तर एक विकायला जातो. एसटी डेपोत भ्रष्टाचार केला जातोय. मग महामंडळ कसं फायद्यात येईल. तुम्ही भ्रष्टाचार करत असाल आणि त्याचा फास कर्मचाऱ्यांभोवती आवळला जातोय. सरकारने निर्णय घेतला नाही तर सर्व कर्मचारी मंत्रालयावर धडक देईल असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.