एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन; कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 01:22 AM2020-11-10T01:22:34+5:302020-11-10T01:23:59+5:30

तीन महिन्यांच्या थकित वेतनाची होती मागणी

ST workers' agitation; The families of the employees also participated | एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन; कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी

एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन; कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी

Next

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसमवेत अखेर मुंबई, पुण्यासह राज्यभर आक्रोश आंदोलन केले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर झालेल्या या आंदोलनात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. मान्यता प्राप्त कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा हा पुढचा टप्पा होता. २ नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. 

आंदोलनात चालक, वाहक तसेच तांत्रिक कर्मचारी कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांनी ‘वडिलांना पगार द्यावा’, अशी आर्त विनंती करून अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधले. दिवाळीत घरी अंधार असल्याचे सांगताना त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातही पाणी आले. सध्या सुरू असलेली बससेवा बंद न करता किंवा प्रवाशांना कोणताही त्रास होऊ न देता कर्मचाऱ्यांनी घरीच आंदोलन केले. मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात आंदोलन झाले.

महिन्याचे वेतन जमा
संध्याकाळी ऑगस्ट महिन्याचे वेतन राज्य सरकारने जमा केले.  कोल्हापूर विभागातील वेतनाचे साडेसात कोटी रुपये आणि फेस्टिव्हल ॲडव्हान्सही जमा झाले. दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे वेतन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे संजीव चिकुर्डेकर यांनी केले. 

आईचा पूर्ण पगार द्या...
आईचा पूर्ण पगार द्या, अशी साद औरंगाबादमधील एका महिला एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने राज्य सरकारला घातली. अलिना सिद्धीकी असे या मुलीचे नाव आहे. तिची आई साबेरा सिद्धीकी या एसटी महामंडळात लिपीक म्हणून कार्यरत आहेत.

महामंडळावर गुन्हा दाखल करा 
काम करूनही तीन महिन्यांचे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही. हा वेतन प्रदान अधिनियम १९३६ या कायद्यानुसार फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) नागपूरमध्ये कामगार उपायुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: ST workers' agitation; The families of the employees also participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.