बारामतीहून पहाटे ३.३० वाजता निघाले अन् एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन ‘राजदरबारी’ पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 05:52 PM2021-11-11T17:52:16+5:302021-11-11T17:53:06+5:30

आज एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंज निवासस्थानी पोहचले. तेव्हा राज ठाकरेंनी आधी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवा, कारण आत्महत्या करणाऱ्यांचं राज ठाकरे नेतृत्व करत नाही अशी अट घातली

ST Workers Delegation meet MNS Raj Thackeray for ST employee strike issue | बारामतीहून पहाटे ३.३० वाजता निघाले अन् एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन ‘राजदरबारी’ पोहचले

बारामतीहून पहाटे ३.३० वाजता निघाले अन् एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन ‘राजदरबारी’ पोहचले

googlenewsNext

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून ST कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. कर्मचाऱ्यांचा संप चिघळत चालला आहे. संप बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने सांगितलं त्यानंतर महामंडळाकडून ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. एसटी कर्मचाऱ्यांचा राजकीय बळी जाऊ नये असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणतायेत. कारण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे, भाजपा उतरली आहे.

आज एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंज निवासस्थानी पोहचले. तेव्हा राज ठाकरेंनी आधी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवा, कारण आत्महत्या करणाऱ्यांचं राज ठाकरे(Raj Thackeray) नेतृत्व करत नाही अशी अट घातली. यावेळी राज ठाकरे यांच्यासमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा पोटतिडकीनं मांडणारे नेते होते मोहन चावरे. हे मोहन चावरे सध्या एसटीच्या सेवेत आहेत. ते मनसेच्या एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे संपाचं नेतृत्व करणाऱ्यांपैकी मोहन चावरे नेते आहे. गेल्या दहा वर्षापासून ते मनसेच्या कामगार सेनेत सक्रीय आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज ठाकरे सक्रीय झालेत. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवत हा विषय मार्गी लावावा अशी मागणी केली होती. आता संपाची धग मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत पोहचली आहे. तीव्र होत चाललेल्या संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ लागली आहे. त्यामुळे या विषयावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे कर्मचाऱ्यांना भेटणार असल्याचं समजताच मोहन चावरे बारामतीहून मुंबईला दुचाकीवरुन आले. मध्यरात्री ३.३० वाजता बारामतीहून निघाले आणि सकाळी १०.३० वाजता दादरला मनसेच्या कामगार सेनेच्या कार्यालयात पोहोचले.  

बारामती येथील विभागीय कार्यशाळेत मोहन चावरे मुख्य मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत. दोन वर्षांनी ते निवृत्त होणार आहेत. राज ठाकरेंकडे मोहन चावरे हे कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडत होते. मोहन चावरे म्हणाले की, तुम्हीच महाराष्ट्राचे तारणहार आहे. १ लाख कुटुंबाचं प्रतिनिधीत्व मी करतोय. सगळ्यांची दिवाळी गोड झाली. आमच्या कुटुंबीयांचं काय झालं? पोरांना कपडे घ्यायलाही पैसे नव्हते. आज ३७ आत्महत्या झाल्या उद्या ३७० होतील. सरकारने महामंडळाचं विलिनीकरण करण्यासाठी आयोग निर्माण करा. हा धोरणात्मक निर्णय आहे तो १-२ दिवसांत होणार नाही हे आम्हालाही मान्य आहे परंतु तोपर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तोच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा इतकी साधी मागणी मान्य करा त्यानंतर हिवाळी अधिवेशनात विलिनीकरणाचा प्रस्ताव मांडा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मार्गी लावा अशी मागणी त्यांनी केली.

ठाकरे बंधूंवर विश्वास

गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलन आता कुठेतरी थांबलं पाहिजं. देवेंद्र फडणवीस यांनाही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे. त्यांच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांचा संप पुकारला होता. फडणवीसांनी हा प्रश्न सोडवला असता तर आज ही वेळ आली नसती. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब बोलतायेत ते काही अंशी बरोबर आहे. राज्यभरात ३७ आत्महत्या झाल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन आहे आत्महत्या हा उपाय नाही. मी ३५ वर्ष एसटीच्या सेवेत आहे. आत्महत्येनं प्रश्न सुटणार नाही. एका कर्मचाऱ्यानेही आत्महत्या केली तर १ लाख कुटुंबाचा एक घटक कमी होतोय. त्यामुळे आत्महत्या करू नये. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी आहे. राजसाहेब अनेक प्रश्नांवर मार्ग काढतात. त्यामुळे त्यांच्याकडे हा प्रश्न मांडल्यावर सुटेल असा विश्वास आहे. आम्ही सर्व पक्षांच्या नेत्यांकडे गेलो. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबप्रमुख आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा ही आमचीही अपेक्षा आहे. तसेच राज ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांचं नवनिर्माण करतील ही अपेक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांवर विश्वास आहे. शेवटी ते दोघं एकाच रक्तातले आहे. असं मोहन चावरे म्हणाले..

Web Title: ST Workers Delegation meet MNS Raj Thackeray for ST employee strike issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.