मुंबई : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारी आणखी तीव्र आंदोलन सुरू केले. राज्यभरातील हजारो आंदोलक मुंबईत धडकले असून आझाद मैदानात त्यांनी ठिय्या दिला. या आंदोलनास भाजपने पाठिंबा दिला आहे. महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.
दोन दिवसांत तब्बल ९१८ जणांचे महामंडळाने निलंबन केले आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी संध्याकाळी परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. मात्र चर्चेतून तोडगा न निघाल्याने उद्या, गुरुवारी पुन्हा चर्चा होईल. मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका कामगारांनी घेतली.
शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
न्यायालयाचा आदेश झुगारून संप पुकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना व ३४१ कर्मचाऱ्यांविरोधात एसटी महामंडळाने बुधवारी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हात जोडून विनंती करतो, संप मागे घ्या : मुख्यमंत्री
राजकीय पक्षांनी कर्मचाऱ्यांना चिथावून त्यांच्या संसाराच्या होळ्यांवर राजकीय पोळ्या भाजू नयेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला. हात जोडून विनंती की, संप मागे घ्या, असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.
ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही आमचेच आहात. मागण्या मान्य करून दिलासा द्यावा, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. न्यायालयासमोर शासनाने प्रश्न सोडविण्यासाठी काय पावले उचलत आहोत, ते सांगितले असून, न्यायालयाचेही समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे पुढील तोडगा काढण्यासाठी समिती नेमून कामही सुरू केले आहे. कृपया सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका.