आंदोलक ST कर्मचारी 'सिल्वर ओक'मध्ये शिरले, सुप्रिया सुळेंना घेरलं; नांगरे पाटीलही पोहोचले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:09 PM2022-04-08T16:09:39+5:302022-04-08T16:28:00+5:30
मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सिल्वर ओकच्या गेटमधून आत येत जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली.
मुंबई-
मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सिल्वर ओकच्या गेटमधून आत येत जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली. यात घरावर चप्पल फेकण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांनी अचानक सिल्वर ओक गाठल्याचं लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे देखील आंदोलक कर्मचाऱ्यांशी बोलायला पोहोचल्या. पण कर्मचाऱ्यांचा संताप काही कमी झालेला नाही.
एसटी कर्मचाऱ्यांशी आता या क्षणाला मी बोलायला तयार आहे. पण त्यांनी शांत राहावं, असं वारंवार आवाहन सुप्रिया सुळे करत होत्या. अनेकदा विनंती करुनही एसटी कर्मचारी काही शांत होत नसल्याचं दिसून आलं. दरम्यान, शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त कमी होता. त्यामुळे पोलिसांचीही दमछाक होताना दिसत आहे. घटनास्थळावरील परिस्थिती चिघळत असल्याचं दिसून येताच मुंबईचे पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील देखील तातडीनं 'सिल्वर ओक'च्या बाहेर पोहोचले आहेत.
VIDEO: आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी 'सिल्वर ओक' बाहेर सुप्रिया सुळेंना घेरलं, सुप्रिया सुळेंनी आंदोलंकांसमोर हात जोडून केलं शांत राहण्याचं आवाहन pic.twitter.com/A1MHuZUVp7
— Lokmat (@lokmat) April 8, 2022
सुप्रिया सुळे यांना यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. "एसटी कर्मचाऱ्यांशी मी बोलायला तयार आहे. त्यांनी शांत राहावं. मी या क्षणाला त्यांच्याशी बोलते. माझे आई, माझे वडील आणि मुलगी घरात आहे. मला त्यांना भेटून येऊ द्यात. ते सुरक्षित आहेत का याची चौकशी करुन येऊ द्यात मी लगेच तुमच्याशी बोलायला येते. पण तुम्ही शांत व्हा", असं आवाहन सुप्रिया सुळे वारंवार करत होत्या.