मुंबई : राज्यात विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. पण मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी कामावर रुजू होताना दिसत आहेत. गुरुवारी राज्यात १८,८८२ एसटी कर्मचारी कामावर हजर झाले होते.
मंगळवारच्या तुलनेत बुधवारी राज्यात कामावर हजर राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या काहीशी कमी होती. मात्र गुरुवारी ही संख्या पुन्हा एकदा वाढली. यात यामध्ये २१२७ चालक, २३३९ वाहक, ९११५ प्रशासकीय कर्मचारी व ५३०१ कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान ७३,३८४ एसटी कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. गुरुवारी राज्यात ४९८ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.तर ३६ एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली. यामुळे आत्तापर्यंत एकूण ९,१४१ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असून १९२८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली आहे.
कामावर रुजू होणारे कर्मचारी
रविवार - १८,३७५
सोमवार - १९,१६३
मंगळवार - १९,०८६
बुधवार - १८,६९४
गुरुवार - १८,८८२
आझाद मैदानात भर पावसातही आंदोलन सुरूच
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊन देखील एसटी कामगार अद्यापही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. मागील दोन दिवस मुंबईत पाऊस पडत असून तापमानात देखील मोठी घसरण झाली आहे. मात्र पाऊस व थंडीची तमा न बाळगता एसटी कामगार आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आंदोलनात सहभागी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी कोणी छत्रीचा आधार घेऊन तर कोणी प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घेऊन आंदोलनात सहभागी आहेत.