ST Workers Strike: एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक; शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून चप्पल-दगड फेक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 03:40 PM2022-04-08T15:40:06+5:302022-04-08T18:59:04+5:30
शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केले.
मुंबई: मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST Workers Strike) संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन करत आहेत. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला असून, अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेक
यावेळी अनेक संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यानंतर आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्वर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आहेत.
मी बोलायला तयार आहे- सुप्रिया सुळे
आज संपकरी कर्मचारी अतिशय अक्रमक झाले आहेत. मोठ्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलण्यासाठी शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर आल्या. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलण्यास तयार असल्याचे प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, सर्वांनी शांत राहावे. कुणीही दगडफेक आणि चप्पलफेक करू नये. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहे, त्यांची सुरक्षा माझ्यासाठी महत्वाची आहे. मी सर्वांचे म्हणने ऐकलाय तयार आहे फक्त त्यांनी शांत रहावे.
कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
यावेळी पोलिसांनी शेकडो कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कर्मचाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात असल्याने पोलिसांनी पोलीस व्हॅनसह स्कूलबस मागवल्या आहेत. त्यात पुरुषांसह महिला कर्मचाऱ्यांनाही बसवण्यात येत आहे. यावेळी अनेक कर्मचारी सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यासोबतच विलिनीकरणाची मागणी करत आहेत. विलिनीकरणाशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.
काय आहे न्यायालयाचा निकाल?
सिंह आणि कोकरूच्या लढाईत आम्हाला कोकराचे रक्षण करावे लागेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती न बाळगता 22 एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. तसेच, कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्यासह त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना एसटी महामंडळाला केली होती. पण, आज पुन्हा एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानात घुसले आणि घोषणाबाजी केली.