मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर ताेडगा म्हणून वेतनवाढ देण्यात आली तरीही राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. आझाद मैदानातील आंदोलनात एसटीचे दहा हजारांपर्यंत कर्मचारी सहभागी झाले होते. एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. रविवारी दोनशे ते तीनशे कर्मचारी आझाद मैदानात होते. महामंडळाने निलंबनाची कारवाईही तीव्र केली असून शनिवारी ३ हजार १० कर्मचारी निलंबित करण्यात आले होते तर रविवारी ९१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
आतापर्यंत महामंडळाने एकूण ६४९७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून राेजंदारीवरील एकूण १५२५ जणांची सेवा समाप्त केली आहे. सेवासमाप्त नोटीस दिलेल्यांपैकी २४० जण कामावर हजर झाले आहेत. रविवारी लेखनिकाची सुटी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होता आले नाही. मात्र सोमवारी कामावर हजर होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे
संपाला हिंसक वळण; ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखलविलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले आहे. संप काळात आतापर्यंत ५० पेक्षा जास्त गुन्हे एसटी प्रशासनाकडून नोंदवण्यात आले आहेत .त्यापैकी तब्बल ३१ गुन्हे हे बसवर दगडफेक केल्याप्रकरणी आहेत. शनिवारी एका दिवसांमध्ये तब्बल १३ बसेसवर दगडफेक झाली. यात चालक, वाहकही जखमी झाले आहेत. राज्यातील विविध आगारांतून सुटणाऱ्या एसटीच्या गाड्यांना पोलीस संरक्षण देण्यात येत आहे; परंतु आगारातून बस काही अंतरावर गेल्यावर दगडफेक केली जात आहे.
कंडक्टर पोलिसांच्या ताब्यातजळगाव आगाराची बस जामनेर येथून रविवारी दुपारी २ वाजता परतीचा प्रवास करीत असताना नेरी जवळील गाडेगाव घाटात उमेश आवटी हा जामनेर आगाराचा वाहक लपून बसला होता. बस समोर येतात त्याने दगड बसच्या काचेवर भिरकावला. एसटी बस चालक सोपान सपकाळे यांनी प्रसंगावधान राखून जागेवर वळण घेतल्याने पुढील काच थोडक्यात बचावली. या बसमध्ये साध्या वेशात बसलेल्या पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. यासंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. सोशल मीडियावरील पोस्ट वाचून भावनेच्या भरात हे कृत्य घडल्याचे त्याने सांगितले.