Join us

ST Workers Strike: आझाद मैदानावरील आंदोलकांना कल्पनाच नव्हती? शरद पवारांच्या घरावर कोण, कसे गेले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 5:41 PM

ST Employees Vs Sharad Pawar: मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील बंदोबस्त वाढविला असून बाहेरून कोणालाही आतमध्ये येऊ दिले जात नाहीय. परंतू बाहेर गावी ज्या कर्मचाऱ्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ दिले जात आहे.

न्यायालयाने एसटी संपावर निर्णय दिलेला असतानादेखील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर धडकले. पवारांविरोधात घोषणाबाजी करत चप्पल फेक, दगड फेक करण्यात आली. काल निकाल आल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला होता. असे असताना आज अचानक आंदोलनाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. 

यामुळे मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील बंदोबस्त वाढविला असून बाहेरून कोणालाही आतमध्ये येऊ दिले जात नाहीय. परंतू बाहेर गावी ज्या कर्मचाऱ्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ दिले जात आहे. यापैकी एका आंदोलक कर्मचाऱ्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, शरद पवारांच्या घरावर जे आंदोलक गेले ते कोण, कसे गेले ते आम्हाला समजलेले नाही. या आंदोलनाबाबत आम्हाला काहीच माहिती नव्हती. वकील सदावर्ते आम्हाला जे काही सांगतील, त्यावर पुढील दिशा ठरेल, आमचे आंदोलन संपलेले नाही, असे म्हणाला. याचबरोबर आपण गावी जात असल्याचे तो म्हणाला. 

यामुळे शरद पवारांच्या घरावर अचानक चाल करून जाण्यामागे कोणाचा हात होता? सुरक्षा यंत्रणा काय करत होती, कोणाला याची भनक देखील कशी लागली नाही, असे सवाल आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अशातच राज्याच्या गृहमंत्र्यांनी या आंदोलनामागील शक्तींची चौकशी करण्याचे आदेश पोलीस दलाला दिले आहेत. यामुळे एसटी आंदोलन प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

अचानकपणे झालेल्या या आंदोलनासमोर पोलिसही हतबल झालेले. मात्र, मुंबईपोलिसांनी चिघळत चालले आंदोलन शांत केले आणि पोलीस बंदोबस्तात एनसीपीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना निवासस्थानी सुरक्षितपणे पोहोचवले. त्यानंतर आंदोलन शांत झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलीस बांधवांचे जाहीर आभार मानले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे. हा आपल्या घरावर झालेला हल्ला असल्याचे मत सुळे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :एसटी संपशरद पवार