ST Workers Strike : एसटी संपात सहभागी तीन हजार एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 05:48 AM2021-11-30T05:48:39+5:302021-11-30T05:49:23+5:30

पहिल्या टप्प्यात तीन हजार कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबनाची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर १५ दिवसांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडणे अपेक्षित होते. काही कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली, तर काहींनी याकडे दुर्लक्ष केले.

ST Workers Strike: Sword of Dismiss hanging over 3,000 ST workers participating in ST strike | ST Workers Strike : एसटी संपात सहभागी तीन हजार एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार

ST Workers Strike : एसटी संपात सहभागी तीन हजार एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार

Next

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईच्या हालचालींनी वेग घेतला आहे. कायमस्वरूपी असलेल्या तीन हजार कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटीस बजावण्यात येणार असून या एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार आहे.

पहिल्या टप्प्यात तीन हजार कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबनाची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर १५ दिवसांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडणे अपेक्षित होते. काही कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली, तर काहींनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार पुढील कारवाई म्हणून महामंडळाकडून बडतर्फीची ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश एसटी मुख्यालयातून सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

बडतर्फ नोटीस मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने ७ दिवसांत उत्तर देणे अपेक्षित असते. या सात दिवसांत उत्तर दिले अथवा नाही दिले तरी महामंडळ आस्थापना आदेश काढून संबंधितांना सेवेतून कायमचे काढून टाकू शकते, असा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.

 अवमान याचिका दाखल करणार
उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना धमकावू नये, अशा सूचना महामंडळाला केल्या होत्या. प्रत्यक्षात महामंडळ कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आणि सर्व बाजूंनी दबाव आणत आहे. याविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे. -शेषराव ढोणे
(सरचिटणीस, कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटना)

२००० प्रशिक्षणार्थींना नियुक्त पत्र देण्यात येणार
एसटी फेऱ्या वेळापत्रकाप्रमाणे धावत्या ठेवण्यासाठी २००० प्रशिक्षणार्थींची महामंडळात नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणार्थींचे ९० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यामुळे अंतिम चाचणी घेऊन त्यांना नियुक्त पत्र देण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Web Title: ST Workers Strike: Sword of Dismiss hanging over 3,000 ST workers participating in ST strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.