Malhar Fest 2024 : कॉलेज फेस्टिव्हल म्हटलं की, तरुणाईच्या आनंदाला उधाण येतं. विद्यार्थ्यांचा सळसळता उत्साह पाहायला मिळतो. आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्याची संधी मिळते आणि मित्र-मैत्रिणींसोबत मजा, मस्ती, धमालही करता येते. कॉलेजची मुलं आवर्जून वाट पाहत असतात ती मुंबईतल्या सर्वात मोठ्या फेस्टिव्हलची तो म्हणजे सेंट झेवियर्स कॉलेजचा प्रसिद्ध 'मल्हार' फेस्टिव्हल. विद्यार्थ्यांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण असून आनंदोत्सव असतो. मल्हारमध्ये भन्नाट कार्यक्रमांची पर्वणी असते. अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून मल्हारची शोभा वाढवतात. 'लोकमत' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर आहे.
मल्हारची यावर्षीची थीम आहे, 'विवा ला विदा' (Viva La Vida ) म्हणजेच Alive with Passion. आयुष्य मोकळेपणाने जगा, जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा विचार यावेळी या थीममधून देण्यात आला आहे. लोकप्रिय असलेल्या मल्हार फेस्टिव्हलला विद्यार्थ्यांचा उडंद प्रतिसाद मिळतो. यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. डान्स, गाणी, बँड यासह विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.
बॉलिवूड आणि क्लासिकल गाण्यांची जुगलबंदी
१६ ऑगस्ट रोजी मल्हार फेस्टिव्हलचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. 'अर्थलॉन' ही त्यांची एक पझल कॉम्पिटीशन होती, 'प्रेस प्ले'मध्ये स्टोरी टेलिंग एक्ट सादर करण्यात आले. 'नवरस' हा क्लासिकल डान्सचा इव्हेंट होता. तर 'दिल बोले हडिप्पा'मध्ये लोकप्रिक कोरिओग्राफरनी येऊन विद्यार्थ्यांना डान्स शिकवला. 'रागोकी बारात'मध्ये बॉलिवूड आणि क्लासिकल गाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.
'क्लोन अ ड्रोन'मध्ये ड्रोनविषयी वर्कशॉप
'ई- स्पोर्ट'मध्ये विविध प्रकारचं गेमिंग होतं. तसेट 'द पॉडक्राफ्ट अकॅडमी'मध्ये पॉडकास्टसंबंधिक एक वर्कशॉप घेण्यात आलं. 'मल्हार मिलंज' ही एक वाईल्ड लाईफ पेटींग कॉम्पिटीशन होती. 'टोस्ट अँड जाम'मध्ये एक विषय देण्यात आला, त्यावर एक मिनिट बोलायचं होतं. 'क्लोन अ ड्रोन'मध्ये ड्रोनविषयी एक वर्कशॉप घेण्यात आलं, ज्यामध्ये प्रोफेशनल लोकांकडून काही गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्या.
विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद
'कॅप्चर इफ यू कॅन' हे शॉर्ट फिल्मचं सेशन होतं. 'स्ट्रीट इट' ही हिपहॉप कॉम्पिटीशन होती. 'जब दिलजीत मेट ईडी' ही एक वेस्टर्न बँड कॉम्पिटीशन होती. या सर्वच इव्हेंटला विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. मल्हार फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी एका कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, डॉ. राधाकृष्णन पिल्लई, डॉ. समीर पाटील आणि लोकप्रिय गायिका अनन्या बिर्ला यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना मोलाचं मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिलं.