Join us  

खासगी स्वायत्त महाविद्यालयांत सेंट झेविअर्स देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:06 AM

एज्युकेशन वर्ल्ड या शिक्षण विषयक मासिकाकडून राष्ट्रीय पातळीवरील शिक्षणसंस्थांची क्रमवारी जाहीरखासगी स्वायत्त महाविद्यालयांत सेंट झेविअर्स देशात अव्वलएज्युकेशन ...

एज्युकेशन वर्ल्ड या शिक्षण विषयक मासिकाकडून राष्ट्रीय पातळीवरील शिक्षणसंस्थांची क्रमवारी जाहीर

खासगी स्वायत्त महाविद्यालयांत सेंट झेविअर्स देशात अव्वल

एज्युकेशन वर्ल्ड या शिक्षणविषयक मासिकाकडून राष्ट्रीय पातळीवरील शिक्षणसंस्थांची क्रमवारी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एज्युकेशन वर्ल्ड या शिक्षणविषयक मासिकाने नुकतेच देशभरातील विविध विभागातील शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये खासगी स्वायत्त महाविद्यालयांच्या क्रमवारीत मुंबईच्या सेंट झेविअर्स महाविद्यालयाने ६३० गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. खासगी स्वायत्त महाविद्यालयांच्या देशाच्या क्रमवारीत मिठीबाई महाविद्यालय, एन.एम. महाविद्यालय आणि आर.ए. पोदार या मुंबई, महाराष्ट्रातील आणखी तीन महाविद्यालयांनीही पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्थान मिळविले आहे. या शिवाय खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या २५ महाविद्यालयांतही मुंबईच्या के.जे. सोमय्या आणि द्वारकादास संघवी महाविद्यालयांचा समावेश आहे. शासकीय स्वायत्त महाविद्यालयात राज्याच्या एकाही महाविद्यालयाला स्थान मिळविता आलेले नाही.

एज्युकेशन वर्ल्ड ही शैक्षणिक विषयांत विविध स्तरावर काम करणाऱ्या खासगी संस्थेचे मासिक आहे . या संस्थेकडून राष्ट्रीय स्तरावर विविध राज्यातील शासकीय स्वायत्त महाविद्यालये, खासगी स्वायत्त महाविद्यालये, स्वायत्त नसलेल्या शिक्षणसंस्था आणि खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये यांचे परीक्षण करून त्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. विविध प्लेसमेंट, प्राध्यापकांची क्षमता, विद्या शाखांचा विकास, महाविद्यालयातील नेतृत्व आणि प्रशासन अशा प्रकारचे निकष विचारात घेऊन श्रेण्यांमध्ये या शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांचे परीक्षण करण्यात आले आहे आणि त्यांना गुणांकन देऊन त्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

स्वायत्त नसलेल्या महाविद्यालयांत देशाच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये मुंबईच्या हिंदुजा महाविद्यालयाने सहावे स्थान मिळविले आहे, तर २७व्या क्रमांकावर मुंबईतील विल्सन महाविद्यालय, ३५व्या क्रमांकावर मुंबईचे एस.के. सोमय्या महाविद्यालय, ४०व्या क्रमांकावर नाशिकचे अशोका महाविद्यालय आणि मुंबईचे रूपारेल महाविद्यालय आहे. याचसोबत ४३व्या क्रमांकावर मुंबईचे सराफ महाविद्यालय आहे.

खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या क्रमवारीत पहिल्या ५० महाविद्यालयांत राज्यातील दहा महाविद्यालयांचा समावेश आहे. वरील दोनशिवाय २७ व्या क्रमांकावर मुंबईतील विवेकानंद महाविद्यालय, २९व्या क्रमांकावर सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, ३३व्या क्रमांकावर पुण्याचे सिम्बॉयसिस महाविद्यालय, ४४ व्या क्रमांकावर मुंबईचे रॉड्रिग्ज महाविद्यालय आणि ठाण्याचे युनिव्हर्सल महाविद्यालय, ४८ व्या क्रमांकावर मुंबईचे मुकेश पटेल महाविद्यालय आणि नागपूरचे रामदेव बाबा महाविद्यालय, ४९ व्या क्रमांकावर पुण्याचे विश्वकर्मा महाविद्यालय आहे.