मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:31 AM2024-05-15T05:31:00+5:302024-05-15T05:31:46+5:30
मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, यात कोणतीच शंका नाही, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवायची आहे. मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकारची आवश्यकता आहे. शेअर बाजाराशी संबंधित धोरण, टॅक्स संबंधित धोरण या सर्वांमध्ये आज जे स्थैर्य दिसत आहे, ते सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे आहे. या स्थिरतेची गॅरंटी पंतप्रधान मोदी देत असून, ते तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतरही बाजारातील स्थिरता कायम राहील, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई स्टॉक एक्स्चेंज येथील कार्यक्रमातून व्यक्त केला.
भाजपच्या जनसंपर्क अभियानांतर्गत मुंबई स्टॉक एक्स्चेंज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच भाजप जनसंपर्क अभियानाच्या प्रमुख शायना एनसी उपस्थित होत्या. यावेळी सीतारामन म्हणाल्या, शेअर बजारातील चढ-उतारांबाबत चिंता व्यक्त करण्याचे कारण नाही. शेअर बजार हा धोरण निश्चितता, कर निश्चिततेवर चालतो. भाजप पुन्हा सत्तेत येणार आहे. त्यामुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचे कारण निर्माण होण्यात काही कारण नाही.
'मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील'
मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, यात कोणतीच शंका नाही. चांगल्या आर्थिक बाजारासाठी जी स्थिरता आवश्यक आहे, ती स्थिरता ते प्रदान करतील. जगातील शेअर बाजारांत अनिश्चिततेचे सावट असताना, भारताच्या शेअर बाजाराने सर्वाधिक चांगली कामगिरी केली आहे. विकासाचा दर खूप चांगला आहे. महागाईचा दर कमी आहे, गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचाही चांगला वापर केला जात असल्याचे निर्मला सीतारामन म्हणाल्या.