‘नोकरीवर असताना अधुत्व आले तर कर्मचाऱ्याला योग्य पदावर नियुक्त करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:59 AM2020-08-14T03:59:39+5:302020-08-14T03:59:52+5:30
बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमाने न्यायालयाला सांगितले की, बस वाहक सदाशिव गायकवाड याला अन्य पदावर रुजू करून घेऊ शकत नाही. कारण त्याला कंबरेखाली ४० टक्के अधुत्व आले आहे.
मुंबई : नोकरीवर असताना अधुत्व आले तर संबंधित कर्मचाºयाची योग्य त्या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. त्यासाठी संबंधित कर्मचारी किती टक्के अधू आहे, हे पाहणे आवश्यक नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमाने न्यायालयाला सांगितले की, बस वाहक सदाशिव गायकवाड याला अन्य पदावर रुजू करून घेऊ शकत नाही. कारण त्याला कंबरेखाली ४० टक्के अधुत्व आले आहे. अपघात झाल्यानंतर गायकवाड ^‘पर्सन विथ डिसॅबिलिटीज अॅक्ट, १९९५’च्या कलम ४७ अंतर्गत अन्य योग्य पदावर नियुक्ती करण्याची मागणी करू शकत नाही. त्यामुळे बेस्टने त्यांना सेवेतून काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, हा बेस्टचा युक्तिवाद न्या. मिलिंद जाधव यांनी फेटाळला. संबंधित कायद्याच्या कलम ४७ अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी व्यक्ती ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अधू असणे आवश्यक आहे, असे न्या. जामदार यांनी म्हटले.
संबंधित कायद्याच्या कलम ४७ नुसार, एखाद्या व्यक्तीला नोकरीवर असताना अपंगत्व आले आणि तो त्याला दिलेल्या पदासाठी अयोग्य ठरत असेल तर त्याला अन्य योग्य त्या पदावर समान सेवा लाभांसह सामावून घ्यावे आणि योग्य पद उपलब्ध नसेल तर ते पद उपलब्ध होईपर्यंत सुपरन्यूमररी पदावर रुजू करावे. बेस्टने संबंधित कायद्याचे कलम ४७ चा लावलेला अन्वयार्थ स्वीकारार्ह नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
गायकवाड यांची सप्टेंबर १९९३ रोजी बस वाहक म्हणून नियुक्ती झाली. ३ मे २०११ रोजी पुणे येथे गावी जाताना अपघातात त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. जानेवारी २०१२ मध्ये ते सेवेत रुजू झाले. काही काळ त्यांची नियुक्ती अन्य पदावर केली होती. मात्र १ सप्टेंबर २०१५ रोजी सेवेतून काढून टाकले होते.