मुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा एक दिवस कमी करण्याच्या निर्णयाबद्दल शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही 5 दिवसांचा आठवडा या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे पगारवाढ अन् दुसरीकडे सुट्ट्यांमध्ये वाढ, सरकारच्या मनात नेमकं चाललंय काय? असे राजू शेट्टींनी म्हटले आहे.
कामकाजाचा एक दिवस कमी करणार असाल तर सरकारने कर्मचाऱ्यांचा त्या प्रमाणात पगारही कमी केला पाहिजे, असे सडेतोड मत बच्चू कडू यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले होते. आता, राजू शेट्टींनीही 5 दिवसांचा आठवडा, या निर्णयामुळे जनतेची कामं होतील का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
लंचटाईमच्या नावाखाली 2-2 तास पाय मोकळे करण्यासाठी हेच कर्मचारी बाहेर फिरताना आम्ही पाहिले आहेत. त्यानंतर, 4 वाजता चहाच्या निमित्ताने ते पुन्हा बाहेर पडतात. आता, 45 मिनिटे जरी त्यांचे काम वाढवले तरीही ते तसेच वागणार आहेत. एकीकडे सातव्या वेतन आयोगातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी वाढतायंत, अन् दुसरीकडे सरकार त्यांच्या सुट्ट्या वाढवतंय. मग, सरकारच्या मनात नेमकं चाललंय काय? असा प्रश्नच राजू शेट्टींनी विचारला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा करण्यात आला असून आठवड्यात 2 दिवस सुट्टी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केलीय.
दरम्यान, कामाचा प्रचंड झपाटा असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करता आहात, हरकत नाही पण जनतेची कामे झाली पाहिजेत तेही कर्मचाऱ्यांना बघा म्हणावं, असा चिमटा मंत्रिमंडळ बैठकीत काढला. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला काहिसा विरोध केला. सरकार दरबारी जनतेची कामे करुन घेण्यात त्यामुळे अडचणी येतील, असे त्या म्हणाल्या. मात्र पाच दिवसांचा आठवडा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अंमलात आणला होता, याची आठवण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करुन दिली. शेवटी राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी एकमताने निर्णय घेतला.
सोशल मीडियातूनही झाली बोचरी टीकापाच दिवसांच्या आठवड्याच्या निर्णयाचे पडसाद लगेच सोशल मिडियावर उमटले. काही जणांनी नाराजी व्यक्त केली. ‘एरवी कर्मचारी लोकांची कामं करत नाहीत. आता कामाचा एक दिवस कमी केल्याने लोकांना त्याचा फटका बसणार’,अशी प्रतिक्रिया उमटली. ‘एक दिवस जास्तीची सुट्टी मिळाली आता तरी कामे करा’ असा सल्लाही देण्यात आला.