विविध कंपन्यांच्या लसी बाजारात येऊन आपल्याला कोरोना व्हायरसपासून किती संरक्षण देतात हे भविष्यकाळ ठरवेल. पण, इतके नक्की की इतर व्हायरसप्रमाणे ठरावीक काळानंतर काेविड व्हायरस स्थायी होईल आणि स्वाइन फ्लू, इन्फ्ल्युएंझासारखा आपल्या सोबत राहील असे वाटते.
..............................
संपूर्ण जग आज कोविडच्या व्हॅक्सिनची वाट पाहत आहे, कारण लोकांना नाॅर्मल आयुष्य जगायचे आहे. लस भारतात, महाराष्ट्रात नेमकी कधी येणार? ती सिरमची असेल, फायझर, मॉडर्ना की अल्ट्रा सेनेकाची असेल, असे अनेक प्रश्न आहेत. कोविड व्हॅक्सिन हा खूप मोठा विषय आहे. त्यासाठी लेखमाला लिहावी लागेल.
व्हॅक्सिनचे प्रकार पाहिले तर ॲक्टिव्ह इम्युनिटी मिळण्यासाठी आर. एन. ए. व्हॅक्सिन, डी. एन. ए. व्हॅक्सिन, व्हायरल व्हेक्टर, व्हायरल सब युनिट, लाइव्ह अन्टेट्युएटेड व्हॅक्सिन, इन ॲक्टिव्हेटेड व्हॅक्सिन, व्ही.आय.एल. स्पिल्ट व्हायरस व्हॅक्सिन, आर.एन.पी. हे सर्व व्हॅक्सिन माॅडर्ना, जेनेसा कोडजेनिक्स सिनोफार्मा सिनॉवॅक, ऑक्सफर्ड, झेनेका, जेमेसा, गॅमलिया स्प्युटनिक, नोवावॅक्स क्लोव्हर बायोफार्मा, ॲडप्ट वॅक, भारत बायोटिक्स सिनाॅवॅक असे प्रकार आहेत. काही आपण पॅसिव्ह इम्युनिटीसाठीही वापरतो. यामध्ये आपण अँटिबाॅडीज् शरीरात देतो. कधी मोनोक्लोव्ह तर कधी मध्यंतरी चर्चेत असलेली रेजोरनॉनची पाॅलिक्लोनल अँटिबाॅडीज्, तर कधी कॉन्व्हॅलेसेंट प्लाझमा, एमआरएनए अँटिबाॅडीज् असे अनेक प्रकार आपल्याला दिसतात.
व्हॅक्सिन शरीरात टोचल्यानंतर त्यातील पार्टिकल्स पेशीमध्ये जातात आणि पेशीबरोबर एकजीव होतात आणि मेसेंजर आरएनए सोडतात. पेशीचे बारीक सूक्ष्म कण त्याची रचना समजून घेऊन स्पाइक प्रोटिन तयार करतात. काही स्पाइक प्रोटिन आपल्यामध्ये स्पाइक तयार करतात आणि पेशींच्या पृष्ठभागावर येऊन चिकटतात. व्हॅक्सीनेटेड पेशी काही प्रोटिनचे तुकडे करतात जे प्रोटिन पेशींच्या पृष्ठभागावर आहे. हे बाहेर आलेले स्पाइक्स आणि स्पाइक प्रोटिनचे तुकडे ‘इम्युन सिस्टम’ म्हणून ओळखले जातात.
जेव्हा ही व्हॅक्सिनेटेड पेशी मरते त्या वेळी त्यातून झालेला निरुपयोगी पदार्थ (कचरा) यात अनेक स्पाइक प्रोटिन्स असतात तसेच त्यामध्ये प्रोटिन्सचे कणही (तुकडे) असतात, ते इम्युन सेल गोळा करते आणि त्याला अँटिजन सेल म्हणून ओळख मिळते. याला मदत करण्यासाठी हेल्पर टी सेलही असतात. या टी सेलच्या पृष्ठभागावर स्पाइक प्रोटिन्स असतात. टी सेलच्या पृष्ठभागावर स्पाइक प्रोटिन्स असतात. टी सेल ही सावधानतेची तसेच संसर्गाच्या विरुद्ध लढण्याची सूचना देतो.
दुसरा इम्युन सेल म्हणजे बी सेल. ते कोरोना व्हायरसच्या स्पाइकमध्ये शिरतात आणि व्हायरस स्पाइकला अडकवून टाकतात. बी सेलला टी सेल मदत करतात. सुरुवातीच्या मदतीनंतर त्याच्यात वाढ होते आणि खूप अँटिबॉडीज् तयार होऊन स्पाइक प्रोटिनला टार्गेट करतात. व्हायरसचा प्रभाव रोखून त्याला थांबवण्यासाठी काेरोना व्हायरसच्या स्पाइकमध्ये अँटिबॉडीज् शिरून त्याला लाॅक करतात आणि पुढच्या पेशी इन्फेक्ट होऊ न देण्यासाठी अटकाव करतात.
अँटिजन सेल हा दुसऱ्या एका टी सेलला ॲक्टिव्हेट करतो त्याचे काम काेरोना व्हायरसने संसर्गित केलेल्या पेशी नष्ट करणे आणि पेशीच्या पृष्ठभागावर स्पाइक प्रोटिन अबाधित ठेवणे हे असते.
माॅडर्ना व्हॅक्सिन हे दोन डोसमध्ये दिले जाणार आहे. माॅडर्ना व्हॅक्सिन कमीतकमी तीन महिने काेरोनापासून संरक्षण देऊ शकेल. व्हॅक्सिनच्या बाबतीत चर्चा करताना काही शब्द आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. यातील एक असलेला ‘अँटिबॉडी’ हा शब्द आपण कोविडच्या काळात खूपदा ऐकला. शरीराच्या इम्युन सिस्टिमने तयार केलेले प्रोटिन जे पॅथोजनला मिळते आणि इन्फेक्टेड पेशीच्या पुढे जाऊन इतर पेशींना रोखण्याचे काम करते.
विविध कंपन्यांच्या लसी बाजारात येऊन आपल्याला कोरोना व्हायरसपासून किती संरक्षण देतात हे भविष्यकाळ ठरवेल. लस तयार होऊन ती ठरावीक तापमानात कोल्डचेन मेन्टेन करून सिरीजमध्ये येईपर्यंत खूप खडतर प्रवास आहे. कारण ही लस फार काळ रूम टेंम्परेचरला ठेवल्यास निरूपयोगी ठरेल.
जगभरातल्या फार्मा कंपन्यांनी व्हॅक्सिन बनविण्यासाठी ट्रिलीयन डाॅलर्सची गुंतवणूक केली आहे. पण, हे व्हॅक्सिन म्युटेशन झाल्यानंतर परिणामकारक ठरते की नाही याचे उत्तर सध्या ठामपणे देता येणार नाही. पण, इतके नक्की की इतर व्हायरसप्रमाणे ठरावीक काळानंतर हा व्हायरस स्थायी होईल आणि स्वाइन फ्लू, इन्फ्ल्युएंझासारखा आपल्या सोबत राहील असे वाटते.
(लेखक राज्याचे माजी आरोग्यमंत्री आहेत.)
- डाॅ. दीपक सावंत