Join us

रखडलेला कोविड भत्ता अखेर कर्मचाऱ्यांना मिळणार, महापौरांचे प्रशासनाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 3:15 AM

Mumbai News : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचाऱ्यांना दिलासा

मुंबई : कोविड-१९च्या  काळामध्ये महापालिका  कर्मचाऱ्यांप्रमाणे  मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  धोक्यात घालून काम केले  आहे त्यामुळे मार्च  २०२० पासून प्रलंबित असलेला त्यांचा कोविड भत्ता  दिवाळीपूर्वी देण्यात  यावा. तसेच या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी यापुढे पालिका अर्थसंकल्पात तरतूद करण्याची सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान व कोविड भत्त्याबाबत महापालिका अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक भायखळा येथील महापौर निवासस्थानी बुधवारी पार पडली. या बैठकीला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य)(प्र.) देविदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे तसेच संबंधित अधिकारी व  संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. क्षयरोग नियंत्रण संस्थेत १९९९ पासून संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मार्च महिन्यापासून हे कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याबाबत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याबरोबर चर्चा केली आहे. यावर्षी बजेट हेड सुरू करण्याचे पत्र देण्यात येईल, जेणेकरून पुढच्या वर्षी या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणे सोयीचे होऊ शकेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई