राजेंद्र भा. आकलेकर, रेल्वेच्या प्रश्नांचे अभ्यासक
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाच्या मधल्या जागेत पूर्वी रेल्वेचे स्पोर्ट्स ग्राउंड होते, ते आता बंद आहे. आता काही जुने कॉटेज, बंगले, एक जुनी मोठी विहीर, एक जुने शंकर मंदिर, पोलीस कार्यालय आणि एका मोठ्या कामगार युनियनचे मुख्यालय आहे. तसेच दादरच्या बऱ्याच अनधिकृत फेरीवाल्याचे अड्डेही तेथे आहेत! त्यांच्या दादागिरीच्या तक्रारी आल्याने २०१२ मध्ये राज्याचे तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील तिकडे गेले. त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. आता लाखो प्रवाशांचा प्रश्न असूनही रेल्वेच्या विस्तारीकरणात या जागेचा विचार झालेला नाही.
म ध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म एकची रूंदी वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म दोन इतिहासजमा होणार आहे. हे फलाट अरूंद असल्याने त्यांचे रूंदीकरण गरजेचे होते. पण दादरच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांतील वापरात नसलेली जागा ताब्यात घेऊन हे काम केले असते, तर त्याचा उपयोग झाला असता. दादरहून सुटणाऱ्या स्लो लोकल परळहून सुटतील आणि ३८ वर्षांनी स्लो दादर गाड्या बंद होतील. यात रेल्वे प्रशासनाने स्वतःचा स्वार्थ पाहिला, की प्रवाशांचा फायदा?
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकाच्या मूळ आराखड्यात प्लॅटफॉर्म एक आणि दोन नव्हते! १९८५ च्या सुमारास स्टेशनचे अपग्रेडेशन करताना दादर स्लो लोकल सुरू झाल्या, तेव्हा उपलब्ध लहान जागेत हे प्लॅटफॉर्म बांधले गेले. तोवर तेथून परळ आणि माटुंग्यामधले इंजिन- डब्यांचे शंटिंग चालायचे. मुंबईहून येणाऱ्या स्लो गाड्या सध्याच्या प्लॅटफॉर्म ३ वर यायच्या. प्लॅटफॉर्म १ आणि २ बांधल्यावर स्लो गाड्या आणि दादर लोकलसाठी नवी सोय उपलब्ध झाली.
मध्य रेल्वेचा प्लॅटफॉर्म एक दुतर्फा करायचा, तर त्यात जागा दादरमधील मोकळी जागा ताब्यात घेण्याचा कळीचा मुद्दा होता. एकीकडे गर्दी वाढत होती. त्यावर तोडगा म्हणून गर्दीला शिस्त लावण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या ड्युट्या लागल्या. दोरखंड बांधले गेले. पण हे उपाय वरवरचे होते. आताही रेल्वेने कायमस्वरूपी जागा ताब्यात घेण्यास बगल दिली आणि आहे त्या जागेत एक प्लॅटफॉर्म इतिहासजमा करून सोय साधली. दादरच्या स्लो गाड्यांच्या ११ जोड्या १५ सप्टेंबरपासून परळहून सुटू लागल्या.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकपदाचा कार्यभार रजनीश गोयल यांनी स्वीकारला. कल्याण आणि ठाणे स्थानकाच्या पहिल्या भेटीदरम्यान त्यांनी पहिले प्राधान्य स्थानकांतील गर्दी कमी करण्यास दिले. त्यांच्या टीमला सध्याचे प्लॅटफॉर्म रुंद करण्यास आणि स्टॉल्स काढण्यास सांगितले होते. गर्दी कमी करण्यासाठी तातडीने लांब पल्ल्याच्या गाडीच्या १८ जोड्या ठाण्याच्या फारशी वर्दळ नसलेल्या फलाटांवर हलवल्या. दादरचाही आराखडा तयार झाला. केवळ प्लॅटफॉर्मचे रुंदीकरणच नाही, तर प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार झाला. दादरच्या प्लॅटफॉर्म पाचच्या रुंदीकरणाची योजना तयार आहे. तेथे दुतर्फा उतरण्याची योजना आहे. त्यामुळे ४ आणि ५ या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची सोय होईल.
दादर लोकल बंद करून परळला नेल्याने गर्दीत फार फरक पडणारं नाही. परळला ऑफिसेस, बिझनेस हबमुळे अधिक गाड्यांची गरज होती. सध्या दादरहून रोज पाच ते सहा लाख जण प्रवास करतात. परळची प्रवासीसंख्या चार लाखांच्या घरात आहे. ते पाहता दादरहून गर्दीच्या वेळेत थोड्या प्रमाणात तरी स्लो गाड्या सुरु करणे गरजेचे आहे.
सध्या कल्याण-कुर्लादरम्यान दोन जादा मार्ग टाकले आहेत. कुर्ला ते परळदरम्यान जादा दोन मार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. तेच नियोजन डोळ्यासमोर ठेवून दादर स्थानकाचे काम सुरू आहे. ते झाले, की लोकलला परळ ते कल्याणदरम्यान चार स्वतंत्र मार्ग मिळतील. रेल्वेने अशी छोटी छोटी, स्वतंत्र कामे हाती घेण्यापेक्षा संपूर्ण स्थानकांच्या विकासाचे काम हाती घ्यायला हवे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ते करून घेण्याची गरज आहे.